दहशतवाद समजून घेताना...
By Admin | Updated: December 23, 2015 01:28 IST2015-12-23T00:40:34+5:302015-12-23T01:28:04+5:30
वेळा ‘गोंधळ’पत्रक

दहशतवाद समजून घेताना...
रिवाजाप्रमाणे ‘किफ’चे वेळा ‘गोंधळ’पत्रक जारी आहे. अगदी दुसऱ्या दिवसापासून ‘टू बी अनाऊन्सड’चे रकाने कोरेच. रोज शेड्यूलमध्ये बदल घडतो. तो प्रेक्षकांना रात्री उशिराच कळतो. त्यामुळे दैनिकांमधूनही जुने तेच छापून येते? मग वेळापत्रक छापून काय उपयोग? असा एका पत्रकाराचा प्रश्न. एक फिल्म बदलली तर त्यामुळे परिणाम होऊ शकणाऱ्या पुढील शेड्यूलमध्ये त्याचवेळी बदल नकोत का? सकाळचे कोणतेच स्क्रीनिंग वेळेवर सुरू होत नाही. मग त्याचा पुढच्या शेड्यूलवरही ताण येतो. गोंधळ वजा होत वेळापत्रक दुरुस्त व्हावे...
‘दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही,’ असं म्हणणारे राष्ट्रप्रमुख पाहिले की मला ब्लॅक कॉमेडीच जाणवते; कारण दहशतवाद हा निर्वातात घडतो असा आभास निर्माण करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो आणि मग लष्करी उत्तर हाच त्यावरचा एकमेव उपाय असतो, म्हणून तर अमेरिका, इस्रायलसारखी राष्ट्रे ‘युनो’मध्ये दहशतवादाची स्पष्ट व्याख्या करण्यासाठी विरोध करतात. तसे घडले तर तेच या व्याख्येत अग्रस्थानी येणार नाही का?
जगभरातील अनेक विचारवंत कॉर्पोरेट दहशतवादाबद्दल इशारा देत असतानाही त्याकडे राष्ट्रधुरीण, माध्यमे आणि जनताही दुर्लक्षच करते. कारण अंतर्मुख होऊन दहशतवादाचे करड्या छटेतून विश्लेषण करण्याची व्यवस्थेची हिंमतही नसते आणि दृष्टीही!
दहशतवादासारख्या ज्वलंत समस्येलाही परंपरेप्रमाणे कृष्ण-धवल छटेत रंगीत-संगीत करून मिरविण्याची व गोंजारण्याची आपल्याकडे संस्कृती असल्याने विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’मधील किंचितसी करडी छटादेखील नीटशी पचविता आली नाही, या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘द अटॅक’चे महत्त्व!
‘द अटॅक’ (२०१२/१०२ मिनिटे) ही इस्रायलची कलाकृती नसून, झियाद दौरी या लेबनीज दिग्दर्शकाची अरेबिक व हिब्रू भाषेतील फ्रान्स, बेल्जियम, कतार आणि इजिप्त, आदी देशांची संयुक्त निर्मिती असणारी कलाकृती आहे. मात्र झियादचा इस्रायलवरील सांस्कृतिक बंदीला विरोधही आहे तेथील काही कलाकारांना घेऊन शूटिंग करण्याच्या आपल्या निर्णयाचे त्याने समर्थनही केले आहे. गंमत म्हणजे अरब जगतातही या कलाकृतीवर एखाद्दुसरा देश वगळता अपवाद वगळता बंदीच आहे. कारण साहजिकच करड्या छटेतून पाहणं कुणालाच मानवत नाही; पण दहशतवादाच्या मुळावर आघात करायचा असेल तर करड्या छटांमधून विवेकी विचार करायला पर्यायच नाही! दुर्दैवाने कुठल्याही असहिष्णू समाजात विवेकवादाला थारा नसतोच.
तेल अविव या शहरात काम करणाऱ्या डॉ. जाफरी या अरब सर्जनच्या पत्नीचा बॉम्बस्फोटात मृत्यू होते; पण हा तिनेच घडवून आणलेला आत्मघाती हल्ला होता, असा पोलिसांचा कयास आहे. डॉक्टरला मात्र हे मान्य नाही. त्याचवेळी मित्रपरिवारातही त्याच्याबद्दल अविश्वास निर्माण होऊ लागतो. दरम्यान, आपल्या पत्नीनेच हा हल्ला घडवून आणला, हे डॉक्टरला कळून चुकते; पण ही गोष्ट आपल्या लक्षात कशी आली नाही? आपली बायको या संदर्भात कधीच का बोलली नाही? या प्रश्नांनी ग्रस्त तो शोध घ्यायला सुरू करतो. या शोधादरम्यान त्याला अरब जगतात त्याच्या पत्नीची हुतात्मा म्हणून ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा प्रत्ययास येते. इस्रायलने अरब वस्त्यांमध्ये केलेल्या दहशतवादी कारवायांचे काय? अरब भूमीवरील ख्रिश्चनांच्याही इस्रायलबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. तिने या बंडखोर गटाला आधी आर्थिक व नंतर संपर्कव्यक्ती म्हणून मदत करायला सुरू केलेली असते; पण शेवटी ती स्वेच्छेने या आत्मघातास तयार झालेली असते. कृती समर्थनीय नसली तरी ती समजून घ्यायला नको का? त्यामुळेच नायकाला झालेला एकूण उलगडा तो शासन यंत्रणेला पुरवण्याचे नाकारतो; पण प्रेक्षकांपर्यंत दहशतवाद करड्या छटांमधून पोचतो. तो समजून घेणे म्हणजे समर्थन करणे बिल्कुल नव्हे, हे तोपर्यंत सत्ताधाऱ्यांना आणि माध्यमांना समजणार नाही, तोपर्यंत दहशतवादावरच्या केवळ लष्करी उपायांनी फार काही साधले जाणार नाही. झियाद दौरीच्या ‘वेस्ट बैरूत,’ ‘लैला सेज’ अशा अन्य काही महत्त्वाच्या कलाकृती होत.
किफनामा
डॉ. अनमोल कोठाडिया