उमेश आपटे : ‘सदृढ बालक-सदृढ समाज’ अभियान उद्यापासून
By Admin | Updated: August 13, 2014 23:39 IST2014-08-13T23:27:08+5:302014-08-13T23:39:25+5:30
सासूला ‘अगं आई’ म्हणा !

उमेश आपटे : ‘सदृढ बालक-सदृढ समाज’ अभियान उद्यापासून
कोल्हापूर : १५ आॅगस्ट ते १५ आक्टोबर या कालावधीत ‘सदृढ बालक-सदृढ समाज’ हे अभियान राबवून कोल्हापूर जिल्हा कुपोषणमुक्त करणार, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे यांनी केली. महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आज, बुधवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित ‘आदर्श अंगणवाडी सेविका ’ पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार होते.
यावेळी अध्यक्ष आपटे म्हणाले, कोल्हापूरसारख्या सधन जिल्ह्यात कुपोषणाचा डाग आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १५ आॅगस्टपासून दोन महिन्यांचे नावीन्यपूर्ण अभियान जिल्हा परिषद राबवित आहे.
या पथदर्शी अभियानाची सुरुवात हातकणंगले तालुक्यातून करीत आहे. आजरा तालुक्यात साडेचारशे बालके कमी वजनाची आहेत. त्यांना सदृढ करण्यासाठी नऊ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. यापैकी ६२ बालके ही उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील असून, त्यांची जबाबदारी आपण घेत आहे. तालुक्यातील उर्वरित बालकांसाठी स्वयंसेवी संस्थांकडून मदत घेतली जाणार आहे. स्वत:चा तालुका ज्यावेळी कुपोषण मुक्त होईल, त्यावेळी इतरांना सांगण्याचे नैतिक अधिष्ठान येईल, असे आपटे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत आहे. कुपोषण मुक्तीच्या अभियानात या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोलाचे असणार आहे. चार-पाच अंगणवाडीतील कुपोषित बालकांना एकत्र करण्यासाठी आरोग्य पोषण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यांना औषध व चांगला आहार दिला जाणार आहे. दरम्यान, ‘महिला साहस’ या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील सातशे अंगणवाडींना मोफत पाण्याचे फिल्टर वाटप व महिलांना खिचडी प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर ‘महिला विषयक कायदा’ व ‘लेक वाचवा’ या भित्तीपत्राचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ४८ आदर्श अंगणवाडी सेविकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. महिला व बालकल्याण सभापती भाग्यश्री गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. समाजकल्याण सभापती शशिकला रोटे, ‘महिला साहस’चे प्रीतम शहा यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे सदस्य अर्जुन आबिटकर, बाजीराव पाटील, एस. आर. पाटील, विमल पाटील, मंगल वळकुंजे, रोहिणी सुभेदार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
यांचा गौरव...
रत्नप्रभा गजरे (जाधेवाडी), सरस्वती गुरव (टिक्केवाडी), बेबीताई पाटील (तांबूळवाडी), सुनीता जाधव (कसबा नूल), मंगल खाडे (तिसंगीपैकी टेकवाडी), वंदना कागवाडे (वाठार तर्फ उदगाव), वैशाली कांबळे ( इंगळी), सुलोचना खाडे (सडोली खालसा), कल्पना खांडेकर (कसबा बीड), अलका देवमाने (रणदेवीवाडी), संगीता गायकवाड (तामगाव), अश्विनी कुलकर्णी (कोडोली), कमल सादळे (बनाचीवाडी), संगीता किटे (चरण), सुगंधा चौगुले (चिंचवाड), दीपा औंधकर (नांदणी), सुमती माडभगत (आल्याचीवाडी), आशा बोरनाक (बामणे), वंदना खामकर (सत्तेवाडी), मुमताज कदिम (नेसरी), वर्षा पांगळे (रामेश्वर मंदिर, गगनबावडा), भारती कोले (दुर्गेवाडी), संध्या पोवार (कबनूर), मंगल पाटील (सावर्डे दुमाला), दीपाली वरपे (साबळेवाडी), सुनीता सुतार (सुरूपली), सुजाता कुंभार (सांगवडे), गीता मोरे (पोहोळे तर्फ आळते), मनीषा कुलकर्णी (राशिवडे बुदु्रक), अंजली माने (नांदगाव पैकी खराडेवाडी), धनश्री ठोमके (चिंचवाड), सुवर्णा ऐनापुरे (नांदणी), संगीता गडदराम (लाकूडवाडी), चंद्रभागा भंडारी (वेंगरूळ), इंदुताई सुतार (चिंचणे), सुप्रिया खटावकर (नेसरी), पूनम वरेकर (सांगशी), माधुरी भानुसे (घुणकी), वंदना चौगुले (तळंदगे), भारती बोलायकर (हळदी), भारती बाटे (विठ्ठलाईवाडी), सुमन पाटील (नंद्याळ), कांचन शिंदे (शिरोली पुलाची), अनिता मेडगुळे (कळे), लता कदम (लाडवाडी), प्रतिभा सुतार (ठाणेवाडी), रेखा ठोमके (उदगाव), पुष्पलता वाळके (अकिवाट).
सासूला ‘अगं आई’ म्हणा !
अलीकडील सुशिक्षित मुली सासूचे मन जिंकण्यासाठी त्यांना ‘अहो आई’ म्हणून हाक मारतात; पण, त्यातून ममत्व निर्माण होत नाही. ज्यावेळी सासूला ‘अगं आई’ अशी हाक माराल, त्याच वेळी सासू-सुनेमधील पारंपरिक नातं संपेल, असा आशावाद अध्यक्ष आपटे यांनी बोलून दाखविला.