विजेचा धक्का बसून दोन हत्ती ठार, सौर कुंपणावर वीजवाहिनी पडल्याने घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:32 IST2025-11-03T12:31:03+5:302025-11-03T12:32:32+5:30
बेळगाव : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे दोन जंगली हत्तींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना हेस्कॉम विभागाच्या निष्काळजीपणामुळे ...

विजेचा धक्का बसून दोन हत्ती ठार, सौर कुंपणावर वीजवाहिनी पडल्याने घडली दुर्घटना
बेळगाव : खानापूर तालुक्यातील सुलेगाळी येथे दोन जंगली हत्तींचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना हेस्कॉम विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करण्यात येत असून, जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अधिक माहिती अशी, देवराई गावाजवळील सुलेगाळी परिसरात शेतकऱ्यांनी शेतीचे रक्षण करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे करंट मशीन बसवले होते. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतातून गेलेली वीजवाहिनी तुटून काही दिवसांपासून जमिनीवर पडलेली होती. या तारेबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
शनिवारी आणखी एक तार तुटून ती झटका करंट लावलेल्या तारेच्या संपर्कात आली. त्यामुळे ती तार विजेच्या प्रवाहाने भारित झाली. त्याचवेळी अन्नाच्या शोधात आलेले दोन जंगली हत्ती त्या तारेच्या संपर्कात आले व जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही हत्तींच्या मृतदेहांची तपासणी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील म्हणाले, ही दुर्घटना हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे घडली असून, वेळेत दुरुस्ती केली असती तर हे दोन निरपराध प्राणी वाचले असते. जबाबदार कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी,”
वन्यजीवांचा जीव धोक्यात
ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे केवळ वन्यजीवच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या आणि सौरतारांचे वेळेवर निरीक्षण व दुरुस्ती केली नाही, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडू शकतात.