ट्रकसह खतांची पोती घेऊन पोबारा केलेले दोघे अटक, दोन दिवसांत लागला छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:19 AM2021-02-18T11:19:17+5:302021-02-18T11:21:21+5:30
खतांची ४०० पोती घेऊन ट्रकसह पसार झालेल्या फसवणूक प्रकरणाचा शाहुपूरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. पोलिसांनी केज (जि. बीड) येथून नटराज रामहरी धस (वय ३२) याला, तसेच मदत करणारा गुणवंत त्रंबक नाईकनवरे (दोघेही रा. इकुरा, ता. केज) यांना अटक केली.
कोल्हापूर : खतांची ४०० पोती घेऊन ट्रकसह पसार झालेल्या फसवणूक प्रकरणाचा शाहुपूरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावला. पोलिसांनी केज (जि. बीड) येथून नटराज रामहरी धस (वय ३२) याला, तसेच मदत करणारा गुणवंत त्रंबक नाईकनवरे (दोघेही रा. इकुरा, ता. केज) यांना अटक केली. त्यांच्याकडून साठ हजार रुपये, चोरीची ४०० खतांची पोती व ट्रक जप्त केले. ग्राहक संस्थेला पोहोचविण्यासाठी दिलेली खतांची पोती आणि ट्रक घेऊन चालक पसार झाला होता.
खेबवडे (ता. करवीर) येथील अक्षय कृष्णात जाधव यांचा ट्रक व्यवसाय आहे. दि. १३ फेब्रुवारीला श्री साई समर्थ ट्रान्स्पोर्ट (मार्केट यार्ड, कोल्हापूर)मधून चार लाख १३ हजार ९३० रुपये किमतीची खतांची पोती भरून ट्रक गुडाळ (ता. राधानगरी) येथील लक्ष्मीनारायण कृषी सेवा केंद्र आणि श्री गुडेश्वर ग्राहक संस्थेकडे पाठवला; पण ट्रक पोहोच न होता तो चालक नटराज धस व गुणवंत नाईकनवरे यांनी परस्पर सांगली येथे नेला. तेथे त्यातील खतांची ४०० पोती दुसऱ्या ट्रकमध्ये भरून पोबारा केला.
दरम्यान, शाहुपूरी पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल झाली. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी माहिती घेऊन सहायक फौजदार प्रकाश भंडारे, युवराज पाटील, प्रशांत घोलप, दिग्विजय चौगुले यांचे पथक केज येथे रवाना केले. तेथे संशयित नटराज धस व गुणवंत नाईकनवरे यांना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजारांची रोकड, तसेच चोरीला गेलेली खताच्या ४०० पोत्यांसह ट्रक जप्त केला.
बनवाबनवी झाली उघड
गुंडाळला ग्राहक संस्थेकडे पाठवलेला खतांचा ट्रक दुसऱ्या दिवशी न पोहोचल्याने ट्रकमालक जाधव यांनी चालक धस याला फोन केला, त्याने आपण रस्ता चुकलो, मी अडचणीत आहे, अशी बनवाबनवीची उत्तरे देऊन बनाव केला. काही वेळाने त्याने मोबाइल बंद केला. त्याचवेळी फसवणुकीचा प्रकार उघड झाला.