दोघा अट्टल घरफोड्यांना अटक
By Admin | Updated: August 31, 2014 00:28 IST2014-08-31T00:26:14+5:302014-08-31T00:28:49+5:30
पाच घरफोड्यांची कबुली : तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

दोघा अट्टल घरफोड्यांना अटक
कोल्हापूर : शहरासह उपनगरांत घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दोघा घरफोड्यांना आज, शनिवार लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी लखन ऊर्फ अस्लम राजेसाब किल्लेदार (वय २४), जुबीर ऊर्फ दाद्या आयुब किल्लेदार (१९, दोघे रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच घरफोड्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोटारसायकल, एलसीडी, लॅपटॉप, मॉनिटर असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना संशयित लखन किल्लेदार व जुबीर किल्लेदार हे दोघे घरफोड्या करीत असून, त्यांच्या घरी चोरीचे साहित्य आहे, अशी माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी आज दुपारी बाराच्या सुमारास या दोघांच्या घरी छापा टाकून त्यांना पकडले. तसेच चोरीचे साहित्यही हस्तगत केले. त्यांनी लक्ष्मीपुरीसह शाहूपुरी व करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यापैकी पाच घरफोड्यांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
दोघेही घरफोड्या करण्यामध्ये पटाईत आहेत. लोखंडी सळीने कडी-कोयंडा उचकटून तसेच घराजवळील झाडावरून गॅलरीत उतरून दरवाजाची काच फोडून मुद्देमाल लुटत होते. (प्रतिनिधी)