यंत्रमाग उद्योगासाठी दोन वेगवेगळे वीजदर
By Admin | Updated: July 4, 2015 00:46 IST2015-07-04T00:25:42+5:302015-07-04T00:46:42+5:30
प्रति युनिट ५० पैशांचा फरक : लहान यंत्रमागधारकांवर दरवाढीचा बोजा

यंत्रमाग उद्योगासाठी दोन वेगवेगळे वीजदर
इचलकरंजी : वीजदरासंदर्भात महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे यंत्रमाग उद्योगामध्ये वेगवेगळे वीजदर लागू होत आहेत. एकाच उद्योगात प्रति युनिट ५० पैशांची तफावत येत आहे. २७ अश्वशक्तीपर्यंत वीज वापर असणाऱ्या यंत्रमागांसाठी तीन रुपये ३१ पैसे व २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांकरिता दोन रुपये ९६ पैसे वीजदराची आकारणी होत आहे.
सध्या यंत्रमागासाठी वीज आकारणी करण्यात येत आहे. या निर्णयानुसार सर्व लघुदाब ग्राहकांचा सवलतीचा वीजदर प्रतियुनिट दोन रुपये ५७ पैसे आहे. सवलतीचा स्थिर आकार २७ अश्वशक्तीपर्यंत दरमहा ४० रुपये आणि २७ अश्वशक्तीवरील वीज ग्राहकांसाठी दरमहा ३० रुपये प्रति केव्हीए आहे. स्थिर आकार व वीज आकार यामध्ये आयोगाच्या आदेशानुसार होणारी वाढ सर्व यंत्रमागधारकांना भरावी लागणार आहे. २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांसाठी पाच रुपये सहा पैसेऐवजी पाच रुपये ४३ पैसे प्रति युनिट आकारणी केली आहे. तर २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांसाठी सात रुपये एक पैशाऐवजी सहा रुपये ८८ पैसे प्रतियुनिट केले आहे. याचा परिणाम म्हणून २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमाग वीज ग्राहकांवर ५० पैसे प्रति युनिट असा दरवाढीचा बोजा पडणार आहे.
वीजदराच्या तफावतीमुळे लहान यंत्रमागधारकांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. परिणामी, कापड उत्पादन महाग होणार असल्याने त्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली. तसेच २७ अश्वशक्तीखालील बहुतांश यंत्रमागधारकांनी अद्याप टीओडी मीटर बसविले नसल्याने त्यांच्या वीज बिलामध्ये आणखीन २२ पैसे प्रति युनिट वाढ होईल. त्यांचे वीज बिल तीन रुपये ५३ पैसे इतके होणार असल्याने या यंत्रमागधारकांनी महावितरण कंपनीकडे ताबडतोब अर्ज देऊन टीओडी मीटर बसवून घ्यावेत, आणि तसे बिलिंग करून घ्यावे, असे आवाहन होगाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)