दिवसातून दोनच फेऱ्या; केवळ दोनशेची कमाई...
By Admin | Updated: December 5, 2014 00:46 IST2014-12-05T00:44:01+5:302014-12-05T00:46:16+5:30
मालवाहतूक अडचणीत : खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला

दिवसातून दोनच फेऱ्या; केवळ दोनशेची कमाई...
संतोष मिठारी - कोल्हापूर -महागलेले डिझेल, वाढलेल्या स्पर्धेमुळे घाईला आलेले मालवाहतूक करणारे अॅपे, टाटाएस आणि पिकअप, आदी वाहनधारक औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे अधिकच अडचणीत आले आहेत. दिवसभर स्टॉपवर थांबल्यानंतर कशातरी दोन फेऱ्या त्यांना मिळत आहेत. तसेच कामगार, ट्रकचालक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला असून, त्यांची वसाहतींमधील संख्यादेखील बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.
शहरातील शिवाजी उद्यमनगरमधील उद्योगांना जागा अपुरी पडू लागल्याने पहिल्यांदा शिरोली आणि त्यानंतर गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, जयसिंगपूर, आदी औद्योगिक वसाहतींचा विस्तार वाढला. छोट्या-मोठ्या उद्योग व कारखान्यांच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ वर्षांत या वसाहतींचा व्याप वाढला. त्यावर औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणे, खानावळी, टी-स्टॉल, आदी छोटे व्यवसाय सुरू झाले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तसेच फारसे बौद्धिक श्रम करावे लागत नसल्याने आठवी, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, मध्येच शिक्षण सोडलेल्या मुलांनी मालवाहतुकीच्या व्यवसायाचा पर्याय निवडला. हे काम ते टेम्पो, अॅपे या वाहनांच्या माध्यमातून करू लागले. या व्यवसायात चांगले पैसे मिळत असल्याने २००५ पासून अॅपे, टाटाएस, पिकअप अशा वाहनधारकांची संख्या वाढत गेली. बँका, फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेऊन अनेकांनी गाड्या घेतल्या. साहजिकच स्पर्धा वाढली; शिवाय त्यातच डिझेल, आॅईल महागले आणि आता मंदीची स्थिती सुरू झाली. सध्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणाऱ्या सुमारे आठशेंहून अधिक गाड्या आहेत. नऊ वर्षांपूर्वी दिवसाकाठी ६०० ते ७०० रुपयांची कमाई करणाऱ्या या वाहनधारकांना आता दिवसातून कशाबशा दोन फेऱ्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांची दिवसाची कमाई ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आली असून बँका, फायनान्स एजन्सी, आदींचे हप्ते भागविताना त्यांची कसरत सुरू आहे. व्यवसाय कमी असल्याने हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. त्यामुळे काहींना तर कर्जाची मुद्दल लांबच; पण व्याज आणि दंडाची रक्कम भरताना नाकीनऊ आले आहेत. ‘कॉस्ट कटिंग’मुळे कंपन्यादेखील भाडे देताना ‘बार्गेनिंग’ करीत असून किमान व्याज, गाडीचा हप्ता जावा यासाठी कमी भाडे घेऊन व्यवसाय केला जात आहे. कामगार, ट्रकचालक यांच्या जेवण, नाष्ट्यासाठी असलेल्या खानावळी, टी-स्टॉल, नाष्टा सेंटर चालविणाऱ्यांचीदेखील स्थिती बिघडली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पावलोपावली असलेली त्यांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.
विमा, पासिंग नाहीच
व्यवसायच नसल्याने अनेक रिक्षाचालकांनी आपल्या गाड्यांचे विमा, पासिंगदेखील केलेले नाही. कारण, दिवसभराच्या कमाईतून घरखर्च, डिझेल आणि बँकेच्या हप्त्यांसाठी पैसे बाजूला काढताना त्यांना कसरत करावी लागत आहे.
५गेल्या चार-पाच वर्षांत गाड्याची संख्या वर्षागणिक वाढत गेल्याने व्यवसायात स्पर्धा वाढली. त्यात डिझेल,आॅईलच्या दरवाढीची भर पडली आणि त्याला मंदीचीही जोड मिळाली. मंदीची तीव्रता वाढली आहे. दिवाळीनंतर चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र, त्याउलट स्थिती असून व्यवसाय थंडच आहे. - सुभाष पाटील
(अध्यक्ष, शिवप्रतिष्ठान वाहतूक संघटना)
सकाळी नऊला स्टॉपवर आलो की, सायंकाळी सातपर्यंत दोन ते तीनच फेऱ्या मिळतात. त्यातही ग्राहकाकडून भाडे कमी केले जात आहे. बँकेचे हप्ते, घरखर्च डोळ्यांसमोर येत असल्याने येईल ते, मिळेल त्याप्रमाणे भाडे घेऊन व्यवसाय करावा लागत आहे. मंदीच्या स्थितीमुळे स्थिती बिकट बनली आहे. - सचिन संकपाळ (रिक्षाचालक)