विरोधी आघाडीचे दोन नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:02+5:302021-03-24T04:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी गटाला खिंडार पाडत ...

विरोधी आघाडीचे दोन नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी गटाला खिंडार पाडत विरोधकांनी बाजी मारली असली तरी विरोधी गटातील दिग्गजांना आपल्याकडे वळविण्यात सत्तारूढ गटाला काहीसे यश आले आहे. दोन ताकदीचे नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात आहेत. स्थानिक राजकीय अडचणीमुळे त्यांची गोची झाल्याने अंतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत.
‘गोकुळ’च्या निवडणूकीत सत्तारूढ गट भक्कम आहे, असे वाटत असतानाच एका पाठोपाठ एक धक्के देत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा संचालकांना आपल्या बाजूने वळविले. सोमवारी विरोधी आघाडीसोबत नेत्यांची फौज उभी करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या उलट सत्तारूढ गटाने अगदी शांतपणे शहला काटशहाचे राजकारण सुरू केले. महाविकास आघाडी म्हणून एकसंध झाले असले तरी प्रत्येकाची राजकीय अडचण मोठी आहे. ‘करवीर’ वगळता सगळीकडे विधानसभेसह सर्वच निवडणुकीत एकमेकाविरोधात लढलेले आघाडीत एकत्र आल्याने त्याचे पडसादही तालुक्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली. त्यातूनच राधानगरी, भुरदगड, चंदगड, शाहूवाडी तालुक्यातील नेत्यांची गोची झाली आहे. येथे विधानसभा, साखर कारखान्याचे राजकारण आघाडीसाठी आडवे येत असल्याने पुढील काळात येथे मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे.
शाहूवाडी शिवसेनेतही खदखद
माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर हे सत्तारूढ गटासोबतच राहणार हे निश्चित होते. मात्र, ‘मातोश्री’वरून आलेल्या आदेशानंतर त्यांना भूमिका बदलावी लागली. त्यात त्यांचे कट्टर विरोधक आमदार विनय काेरेही शाहू आघाडीसोबत आल्याने त्यांच्या गटाची गोची झाली आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आले, असा संदेश जनतेमध्ये गेला आहे. यातूनच शाहूवाडी शिवसेनेत काहीशी खदखद दिसत आहे.
अंदाज बघून उड्या सुरूच राहणार
काहीजण कोणते पॅनेल सक्षम होणार, याचा अंदाज घेत आहेत. त्यानुसार भूमिका घेत असून अर्ज माघारीपर्यंत अनेकांच्या उड्या सुरू राहणार आहेत. त्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांना धक्के बसणार हे निश्चित आहे.
‘राधानगरी’तून रवीश पाटील यांचे नाव पुढे
राधानगरीतून उपसभापती रवीश पाटील-कौलवकर यांचे नाव पुढे येत आहे. ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील -कौलवकर यांचे राधानगरीसह भुदरगड, करवीरमध्ये चांगले नेटवर्क असल्याने त्या संबंधाचा पॅनेलला फायदा होऊ शकतो.