बाटलीबंद पाणी पुरवठा करणारे दोन व्यवसाय सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:14+5:302020-12-24T04:21:14+5:30
कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र तसेच नाहरकत पत्र नसल्याच्या कारणावरून रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ॲक्वा प्युअर ...

बाटलीबंद पाणी पुरवठा करणारे दोन व्यवसाय सील
कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाचे प्रमाणपत्र तसेच नाहरकत पत्र नसल्याच्या कारणावरून रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ॲक्वा प्युअर व शुध्द पेयजल हे दोन व्यवसाय महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने बुधवारी सील करण्यात आले.
राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाच्या आदेशानुसार विविध राज्यांतील, जिल्ह्यांतील, शहरांतील थंड पाण्याचे कॅनद्वारे पाणी पुन्हा भरणे, साठा करणे, हाताळणी करणे, विक्री करणे आदी प्रक्रिया करणाऱ्या संस्थांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच अन्न व औषध प्रशासनाचा परवाना असणे आवश्यक आहे. बुधवारी सील केलेल्या दोन्ही व्यावसायिकांकडे व्यवसाय परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, अन्न व औषध प्रशासन यांचे प्रमाणपत्र, नाहरकत पत्र नव्हते. त्यामुळे हे प्रकल्प त्वरित बंद करण्यात आले.
महानगरपालिका हद्दीतील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यावसायिकांवर कारवाई करऱ्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले होते. त्यानुसार शहरातील सात संस्थांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन संस्थांनी मुदतीत व्यवसाय बंद न केल्यामुळे रंकाळा स्टॅण्ड परिसरातील बालाजी ॲक्वा व शुध्द पेयजल यांचे व्यवसाय सील करण्यात आले.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर यांच्या मागदर्शनाखाली संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रवींद्र पोवार, विजय वाघेला, नीलेश कदम, लियाकत बारस्कर, शकील पठाण, राजाराम निगवेकर यांनी केली.