वडणगे खूनप्रकरणी अटकेतील दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:01+5:302020-12-09T04:21:01+5:30
कोल्हापूर : पैसे देवघेवीच्या व्यवहारातून वडणगे फाटा (ता. करवीर) येथील बंडगर मळ्यात रिक्षाचालक योगेश मनोहर शिंदे (वय ३४, रा. ...

वडणगे खूनप्रकरणी अटकेतील दोघांना पोलीस कोठडी
कोल्हापूर : पैसे देवघेवीच्या व्यवहारातून वडणगे फाटा (ता. करवीर) येथील बंडगर मळ्यात रिक्षाचालक योगेश मनोहर शिंदे (वय ३४, रा. प्लॉट नं. ८३, बालावधूतनगर, फुलेवाडी रिंग रोड, मूळ रा. कोंडा ओळ) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली. दीपक रघुनाथ पोवार (३५, रा. शिवाजी उद्यमनगर, मूळ रा. सोमवार पेठ), सागर दत्तात्रय चौगुले (३०, रा. प्लॉट नं. १०, बिल्डिंग नं. १, संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
योगेश शिंदे व दीपक पोवार यांच्यात वारंवार पैसे देणे-घेणे व्यवहार चालत होते. या व्यवहारातूनच दीपक पोवार व सागर चौगुले या संशयितांनी योगेशला वडणगे फाटा येथील शेतात नेले. तेथे पार्टीत दारू पाजून योगेशचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
सोमवारी (दि. ७) दुपारी साडेबाराच्या सुमारास योगेशने घरी पत्नीला मोबाईलवरून फोन लावला. त्यावेळी योगेश हा दोघांची नावे घेऊन मला मारू नका म्हणून ओरडत होता, अशी माहिती मृत योगेशची पत्नी मंजिरी शिंदे यांनी पोलिसांना दिली. शिवाय दीपकनेही योगेशला हातउसनी काही रक्कम परत देण्याबाबत चार दिवसांपूर्वी घरी येऊन वादावादी केली. पैसे परत दिले नाहीस तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचीही माहिती मृताची पत्नी मंजिरी योगेश शिंदे यांनी तक्रारीत दिली आहे.
गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही पोलिसांनी जप्त केली; तसेच अटक केलेल्या दीपक व सागर या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर करीत आहेत.
ऑडिओ रेकॉर्डिंग जप्त
मारहाण करतेवेळी योगेशने पत्नी मंजिरीशी मोबाईलवर साधलेल्या संवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी जप्त केले.
फोटो नं. ०८१२२०२०-कोल-दीपक पोवार (आरोपी खून)
फोटो नं. ०८१२२०२०-कोल-सागर चौगुले (आरोपी खून)
(तानाजी)