Twenty-one-and-a-half months still closed | कसबा बावडा मार्ग अजून दीड महिना बंदच, ड्रेनेजच्या कामाला सतरा विघ्ने

कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंपासमोर ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम रखडले असून, त्याचा नाहक त्रास शहरवासीयांना होत आहे. मंगळवारी तिथे पोकलॅनने उकरण्याचे काम सुरु होते. (आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देकसबा बावडा मार्ग अजून दीड महिना बंदचड्रेनेजच्या कामाला सतरा विघ्ने : महापालिकेचा गलथान कारभार

कोल्हापूर : खानविलकर पेट्रोल पंपासमोरील ड्रेनेज लाईनचे रखडलेले काम नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून, महापालिका प्रशासन मात्र कामाच्या पूर्ततेबाबत उदासीन आहे. कामात तांत्रिक तसेच आर्थिक अडचणी वाढल्या असल्या, तरी त्या दूर करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत नाही. कासवगतीने काम सुरू असून, अशीच गती राहिल्यास काम पूर्ण होण्यास आणखी किमान दीड महिना लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी कायम राहणार आहे.

कसबा बावडयाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे काम असल्याने त्याची वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयापासून वळविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारंवार आंदोलने, निषेध मोर्चे सुरु असतात. त्यामुळे त्या परिसरात वाहतूकीची प्रचंड कोंडी होती. सोमवारी दिवसभर तिथे चालत जाणेही मुश्कील झाले होते. जो पर्यायी मार्ग आहे, तिथेही मोठे खड्डे आहेत. त्यात किमान मुरुम टाकण्याचीही तसदी महापालिकेने घेतलेली नाही. त्या परिसरातील नागरिकांना याचा कमालीचा त्रास होत आहे.

नागाळा पार्क ते चिपडे सराफ दुकान या मार्गावर ४०-४५ वर्षांपूर्वी एक ड्रेनेजलाईन टाकण्यात आलेली होती. ड्रेनेज लाईनच्या वर काही अपार्टमेंट तसेच बंगले उभे राहिले आहेत. ड्रेनेज लाईन तुंबली असून, ती दुरुस्त करणे अशक्य असल्यामुळे ही ड्रेनेज लाईन तेथून वळविण्यात येणार आहे. तोंडावर पावसाळा आहे, हे माहीत असूनही कामाला सुरुवात करण्यात आली. कामाची मुदत ४५ दिवसांची होती. ती आता ६० दिवसांपर्यंत वाढविली आहे. सध्याची गती पाहता मुदतीतही काम पूर्ण होणे अशक्य आहे.

ही ड्रेनेज लाईन २० फूट खोल असून, खुदाई करताना काळी माती लागली आहे. दोन्ही बाजूंनी काळी माती पडत असते. शिवाय ही लाईन टाकत असताना जयंती नाल्यापासून ‘एसटीपी’कडे जाणारी सांडपाण्याची एक लाईन, तर शिंगणापूरहून कसबा बावड्याकडे जाणारी रॉ वॉटरची एक लाईन आहे. बीएसएनएलची केबल टाकली गेली आहे; त्यामुळे काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

ड्रेनेज लाईन टाकत असलेल्या भागात सर्वत्र काळी माती असल्यामुळे उकरलेला भाग किमान मुरमाने भरून घ्यावा, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. जर तो मुरूम टाकून भरला नाही, तर टाकण्यात येणारी ड्रेनेज लाईन खचण्याची शक्यता आहे. मुरूम टाकायचा झाल्यास त्याचे बजेट वाढणार आहे. त्याला महापालिका प्रशासनाने मान्यता दिलेली नाही, अशा तांत्रिक व आर्थिक अडचणींमुळे हे काम संथ गतीने सुरू आहे.


काम करताना ठेकेदारास खूप अडचणी येत आहेत. शेजारील कोणत्या पाईपलाईनला, केबलला धक्का लावून चालणार नाही. या अडचणींवर मात करून जलदगतीने काम करायचे म्हटले, तरी दीड ते दोन महिने लागणार आहेत.
आर. के. पाटील,
पर्यावरण अभियंता, कोल्हापूर महापालिका

उदासीन प्रशासन

या कामाच्या बाबतीत प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. जमीन काळवट असल्याची तसेच २0 फुटाने खुदाई करून पाईप लाईन टाकायची असतानादेखील कमीत कमी खर्चाचे अंदाजपत्रक करण्यात आले. आता वाढीव खर्चाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे, अन्यथा ठेकेदार काम अर्धवट सोडण्याची शक्यता आहे. रखडलेल्या कामाचा नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. महापुराच्या काळात ज्या गतीने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला, तशाच पद्धतीने हे कामदेखील पूर्ण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

Web Title: Twenty-one-and-a-half months still closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.