अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:20 IST2019-08-19T00:20:09+5:302019-08-19T00:20:13+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ...

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप
कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत. पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून, तब्बल १९,५३० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पात्रात जाईल असे झाडे, नाल्यात मृत जनावरांचे सांगाडे अडकलेले
दिसत असल्याने हा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दूधामुळेच शेतकºयांचे संसार उभे राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे आठ लाख दूभती जनावरे असून गावागावात कुकुटपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.
गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सुपाने ओतणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अंगात हुडहुडी भरवणारी थंडीने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते, तिथे मुक्या पशु-पक्षांची तर दैना उडाली होती. या वातावरणाने पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले. या आठ दिवसांत जिल्ह्यात १९५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.
पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले असून ओढे, नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पात्रात जाईल, तशी मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसू लागले आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुका पशुधन कुक्कुटपक्षी
करवीर ७४ -
शाहूवाडी १३ -
गगनबावडा ९ -
पन्हाळा ३५ -
कागल ७ -
गडहिंग्लज १२ ३७००
चंदगड ६ -
भुदरगड २ ८६७०
राधानगरी १९ ८०
आजरा ५ ३५००
शिरोळ ३२ ३००
हातकणंगले ४० ३२८०
एकूण २५४ १९५३०
नुकसान लाखात
भरपाई हजारात
राज्य सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार तर लहान जनावराला ३ हजार रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.
पुराच्या पाण्यात लाख रूपये किमंतीच्या गायी व म्हैशी वाहून गेल्या पण त्याची भरपाई हजारात मिळणार आहे.