‘रविकिरण’च्या ‘त्या’ बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:10+5:302020-12-15T04:41:10+5:30
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील ...

‘रविकिरण’च्या ‘त्या’ बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या रविकिरण पेपर्स मिल्स प्रा. लिमिटेड या कंपनीमधील आंदोलनात सहभागी झालेल्या बारा कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कंपनी व्यवस्थापनाने केले आहे. कंपनीने नेमलेल्या सर्व कायम कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार, प्रॉव्हिडंट फंड, कामगार आरोग्य विमा योजना याचे लाभ दिले जात आहेत. कंपनीकडील ठेकेदार यांच्याकडूनही कामगारांना सर्व कायदेशीर लाभ दिले जात होते.
कंपनीतील १८ कामगारांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२० पासून युनियनच्या सल्ल्याने कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे संपास सुरुवात केली आहे. कंपनीतील या कामगारांनी याकरिता केवळ कायद्याप्रमाणे जाहीर होणाऱ्या ''''महागाई भत्ता'''' फरकाची मागणी केलेली आहे.
याबाबत कंपनीतर्फे पहिल्यापासून सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देत असल्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांचा महागाई भत्ता फरक त्यातच समाविष्ट असल्याने पुन्हा नव्याने देणे कायदेशीररीत्या बंधनकारक नाही, असे कळविले आहे. ‘युनियन’च्यावतीने कायदेशीर बाब समजावून घेतली नाही.
कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या भत्त्यात कायदेशीर मतभेद असल्यास न्यायालयात दाद मागावी. न्यायालयाने जर कामगारांच्या मागणीनुसार सर्व लाभ द्यावे असे सुचविल्यास कंपनी देण्यात तयार आहे. कामगारांवर जर कंपनीने अन्याय केल्यास दाद मागायला कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना चुकीच्या मार्गाने व आडमुठेपणाची भूमिका घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपासारखे टोकाचे हत्यार उपसून कामगारांना व कंपनीस ८ सप्टेंबर २०२० पासून वेठीस धरले आहे.
कंपनीतील संपात सध्या सहभागी असलेल्या १२ कामगारांना वारंवार आवाहन करूनही आजतागायत ते कामावर हजर झालेले नाहीत. युनियनने कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता कामगारांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गाने आंदोलन करून कंपनीची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले.