Kolhapur: पाटगावच्या जंगलात टस्कर दाखल, पिकांचे केले नुकसान
By संदीप आडनाईक | Updated: April 20, 2024 18:15 IST2024-04-20T18:13:57+5:302024-04-20T18:15:34+5:30
हालचालींवर वनविभागाची नजर

संग्रहित छाया
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील अंतुर्ली-शिवडाव जंगलातून पाटगाव जंगलातील मानोपे वनक्षेत्रात टस्करने मुक्काम ठोकल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजरा वनविभागाच्या हद्दीतून दहा दिवसांपूर्वी निघालेला हा हत्ती डेळे, चिवाळे, चाफेवाडी, पाळ्याचा हुडा, अनफ खूर्द, अंतुर्ली, शिवडाव, विंजोळे या मार्गावरुन आज पहाटेच्या सुमारास पाटगाव जंगलातील मानोपे वनक्षेत्रात मुक्कामाला आला आहे. कोंडूशी, अंतुर्ली गावातून प्रवास करत शिवडाव येथील रेडे ओहळ, मानोपे जंगल परिसरात या टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून तो खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक करत आहे.
आजरा तालुक्याच्या वनहद्दीतून गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी या टस्करने तालुक्यातील डेळे-भारमलवाडी जंगलात विश्रांती घेतली होती. त्यानंतर या टस्करने चाफेवाडी या जंगलातून पाळ्याचा हुडा आणि अनफ खुर्द या गावातून कोंडूशी, अंतुर्ली वनहद्दीत प्रवेश केला. रात्री अन्न आणि पाण्याच्या शोधात आलेल्या या हत्तीने अंतुर्लीच्या जंगलातून फेरफटका मारत शिवडाव, नाईकवाडी, पाटगांव, आडे या गावातील शेत शिवारात तो दाखल झाला.
हालचालींवर वनविभागाची नजर
दरम्यान, या हत्तीच्या हालचालींवर उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडगांव वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, तांबाळेचे वनपाल किरण पाटील, पाटगावच्या वनपाल लुडदिना डिसोझा तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
ग्रामस्थांना इशारा
हत्तीचा वावर शेत शिवारात दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे. या परिसरातील शेतातील भात पिकाचे आणि ऊस पिकाचे नुकसान हत्तीने केले आहे. टस्करचा वावर असलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.