आदिवासी बदलताहेत : आमटे

By Admin | Updated: January 18, 2015 00:36 IST2015-01-18T00:34:52+5:302015-01-18T00:36:38+5:30

रोटरी समाजसेवा पुरस्कार प्रदान : अंधश्रद्धेचा पगडाही कमी झाला

Tribals are changing: Amte | आदिवासी बदलताहेत : आमटे

आदिवासी बदलताहेत : आमटे

कोल्हापूर : हेमलकसा येथे १९७२ पासून वैद्यकीय सेवेबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणासाठी काम केले. आदिवासींच्या मुलांबरोबर स्वत:च्या मुलांनाही शिकविले. आजार बरा करण्यासाठी मांत्रिकाऐवजी वैद्यकीय उपचारच उपयुक्त आहेत, ही बाब आदिवासींवर प्रत्यक्ष कृतीतून बिंबवली; त्यामुळे आदिवासींमध्ये शिक्षणाची जाणीव निर्माण झाली. तेथील युवक आणि युवती डॉक्टरही बनल्या. अंधश्रद्धेचा पगडा कमी झाला, हेच या तीस वर्षांतील तपश्चर्येचे फळ आहे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
येथील रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्रातर्फे डॉ. प्रकाश आमटे यांना रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गणेश भट यांच्या हस्ते या वर्षीचा ‘रोटरी समाजसेवा पुरस्कार’ देण्यात आला. तसेच डॉ. मंदाकिनी आमटे यांनाही गौरविण्यात आले. यानंतर आनंदवन ते हेमलकसा येथील वाटचालीचा आलेख डॉ. आमटे यांनी मांडला.
डॉ. आमटे म्हणाले, बाबांसोबत १९७२ मध्ये हेमलकसा येथे वैद्यकीय सेवेला सुरुवात केली होती. तेव्हा आदिवासींच्या जीवनाचे विदारक चित्र मनाला हेलावणारे होते. कुपोषण, वस्त्रांचा अभाव, शिक्षण आणि अनारोग्य या आदिवासींच्या प्रमुख समस्या होत्या.
स्त्रियांच्या बाळंतपणाचा विषय गंभीर होता. आजार बरा होण्यासाठी आदिवासी मांत्रिक बाबांचा आधार घेत होते. त्यामुळे सुरुवातीला एकही रुग्ण आमच्याकडे येईना. त्यामुळे मांत्रिकाकडून न झालेले आजार बरे करून आदिवासींचा विश्वास संपादन केला.
वैद्यकीय सेवेबरोबरच आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणावरही भर दिला. परिणामी आदिवासी युवक-युवतींनी वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण घेऊन इथेच वैद्यकीय सेवेस सुरुवात केली आहे. आमच्या नातवंडांच्या रूपाने आमटे घराण्याची चौथी पिढी आज आदिवासींच्या कल्याणासाठी झटत आहे. यावेळी रोटरी पुरस्कार कमिटीचे चेअरमन डॉ. यशवंत तळवलकर, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष रो. सुभाष मालू यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष रो. अविनाश रास्ते आणि मंदार पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अमित माटे यांनी आभार मानले. महेश धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले, तर मीरा सहस्रबुद्धे यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Tribals are changing: Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.