वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही
By Admin | Updated: July 8, 2016 00:59 IST2016-07-08T00:15:13+5:302016-07-08T00:59:32+5:30
उद्यान विभाग : बिल अदा करूनही माहिती देण्यास असमर्थता; ढपल्याची शक्यता

वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही
कोल्हापूर : प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करणे कायद्याने बंधनकारक असताना महानगरपालिकेने गेल्या सहा वर्षांत वृक्षगणना केली किंवा नाही याची माहिती उघड करण्यात उद्यान विभागाने असमर्थता दाखविली आहे. एका ठेकेदाराने अर्धवट काम केल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडून वृक्षांची गणना करून घेण्यात आली; परंतु माहिती उघड न केल्यामुळे काम चोखपणे झाले की नाही, याची शंका येऊ लागली आहे.
उद्यान विभागासह अन्य अधिकाऱ्यांनीही वृक्षगणनेबाबत तोंडावर बोट ठेवल्यामुळे या कामातही ढपला पाडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कामात केवळ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनाच नाही, तर खुद्द महानगरपालिकेने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेतही ही माहिती मागूनसुद्धा सादर केलेली नाही.
उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच कायद्याने प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षगणना करणे आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे ही गणना केली असे दाखविले जाते; परंतु प्रत्यक्षात त्याचा तपशील कधीही बाहेर येत नाही. सहा वर्षांपूर्वी वृक्षगणनेचे सुर्वे कन्सल्टंटना काम देण्यात आले. त्यांनी ४० प्रभागांचे काम पूर्ण केल्यानंतर अहवालात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. झुडपांनाही त्यांनी वृक्ष म्हणून गणले गेल्याची बाब पुढे आली. त्यांना अहवाल दुरुस्त करून द्या, असे प्रशासनाने सांगितले. त्यावेळी त्यांनी काम अर्धवट सोडले.
एका ठेकेदाराने काम सोडल्यानंतर मुंबईतील दुसऱ्या ठेकेदाराकरवी हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना ३२ प्रभागांतील काम देण्यात आले. त्यांनी काम पूर्ण केले की नाही, अहवाल दिला की नाही, याचा कोणताही तपशील अद्याप दिलेला नाही.
शहरात कोणत्या ठिकाणी किती वृक्ष आहेत, त्यांची जात कोणती आहे, उंची किती आहे, घेर किती आहे, धोकादायक वृक्ष कोठे आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल तयार झाला की त्या आधारावर वृक्षलागवडीचे धोरण निश्चित करण्यात येते; पण असा अहवालच प्रसिद्ध झाला नसल्याने धोरण ठरलेले नाही.
७० ते ८० लाख खर्च
शहरात अंदाजे सात लाख वृक्ष असल्याची माहिती सांगण्यात येते. प्रत्येक वृक्षाची गणना करून माहिती संकलित करण्यासाठी पहिल्या ठेकेदारास आठ रुपये ५० पैसे, तर दुसऱ्या ठेकेदारास १० रुपये ४० पैसे दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. या हिशेबाने या वृक्षगणनेवर ७० ते ८० लाख रुपये खर्च झाले असण्याची शक्यता आहे; पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही.