आहारमूल्यांचा खजिना

By Admin | Updated: August 3, 2014 23:34 IST2014-08-03T23:05:19+5:302014-08-03T23:34:25+5:30

रोज १०० ते १२५ टनाची विक्री : केळ हे आरोग्यदायी, बहूपयोगी फळ

Treasure trove | आहारमूल्यांचा खजिना

आहारमूल्यांचा खजिना

सचिन भोसले - कोल्हापूर
केळ हे सर्वांच्या परिचयाचे फळ आहे. आहारमूल्यांचे उच्च प्रमाण असूनही स्वस्त दरात उपलब्ध होणारी केळी ‘सर्वसामान्यांचे फळ’ म्हणून प्रसिद्ध आहेत. घराघरांत आवडीने खाल्ले जाणारे हे फळ आहे. अशा या केळामध्ये विविध औषधी गुणांचा खजिना आहे. तसेच उपवास म्हटले की, फराळासाठी हमखास पुढे केले जाणारे बारमाही फळ म्हणजे केळी होय. अशा या केळीचा गोडवा काय वर्णावा! त्याचे महत्त्व ‘लोकमत’संगे जाणून घेऊ. कोल्हापूरकरांना अशीही केळी रोज १०० ते १२५ टन लागतात. तर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद या सणांत दीडशे टनांपर्यंत विक्रीही होते.
मुसा जातीच्या झाडांना आणि त्यांच्या फळाला ‘केळी’ असे म्हणतात. केळीचे मूळ स्थान दक्षिणपूर्व आशियातील मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात केळीची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठी याची लागवड करण्यात येते.
--जेवणानंतर फळे खाणे आरोग्यास अधिक फायदेशीर असते. आपल्या तब्येतीनुसार जेवणानंतर सगळ्यांनी मोसमी फळे खाल्ली पाहिजेत. फळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन तसेच व्हिटॅमिन मिळत असतात.
---शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. फळांमध्ये केळी हे फळ तर आहेच; परंतु ते एक उत्तम आहे. केळी खाल्याने भूक शमते व आरोग्याला लाभदायी असते. पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर व प्रोटीन आढळतात, तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक मिळते. कच्च्या केळीची भाजीही केली जाते.
--दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक अशा सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांची पूर्तता होते. सकाळी उठल्यानंतर दोन केळी खाल्ल्यानंतर कोमट दूध पिले पाहिजे. नैसर्गिकदृष्ट्या पिकलेले केळ आरोग्यास
उत्तम असते.
--एक ग्लास दुधात एक चमचा शुद्ध तूप, चिमूटभर इलायची पूड मिसळून एक केळी खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच दररोज दोन केळी खाल्ल्यानंतर हृदयरोग व रक्तदाबही प्रमाणात येण्यास मदत होते.
--विविध रासायनिक आणि कृत्रिम औषधे, ज्यांमध्ये एस्परिन, इंडोमेथासिन, सिस्टयामाईन, हिस्टामाईन यांचे सेवन केल्यानंतर अनेक लोकांचे तोंड येते. तोंडात व्रण पडतात. आधुनिक संशोधनानुसार कच्चे केळ वाळवून त्याचे चूर्ण तयार करून सेवन केल्यास तोंड येत नाही.
पिकविण्याची पद्धत
--साधारणत: केळी बंद खोलीत पिकविली जातात; तर मुंबई व चेन्नई या ठिकाणी शेणींचा धूर करून बंदिस्त खोलीत केळींना पिकविले जाते. याचबरोबर सर्वसामान्य तापमानाला केळी पिकविली जाते. उन्हाळ्यात १८ ते २४ तास धुरी दिली जाते; तर हिवाळ्यात ४८ तास धुरी दिली जाते.
--केळी काढल्यानंतर पिवळा रंग येण्यासाठी ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. कार्बाईड घालून केळी पिकविण्याच्या पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे. अशी केळी खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने या पद्धतीवर बंदी आहे.
असा होता उपयोग
--पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो. सध्या केळीपासून वेफर्स, जाम, भुकटी, पीठ, प्युरी, सुकेळी, पेठे, शिरका, बिस्कीट असे अनेक पदार्थ तयार केले जातात. कच्च्या केळीची भाजी पूर्वीपासून बनवितात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. तसेच जनावरांना चारा म्हणूनही केला जातो; तर वाळलेली पाने इंधन म्हणूनही वापरता येतात.
सांस्कृतिक महत्त्व
--केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज, अशा शुभकार्याप्रसंगी प्रवेशद्वारावर केळीचे दोन उंच व पाने असलेले खांब रोवून त्यांचे तोरण केले जाते.
केळी उत्पादनात भारत अग्रेसर
--केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारत प्रथम, तर देशात महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते. भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात २५ टक्के उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा अग्रेसर आहे. रावेर आणि यावलमध्ये केळी उत्पादन अधिक आहे.
केळीच्या जाती
---बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, वसई, जवारी, हेब्बाळी, लालकेळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमोशेल, पिसांग, लिलिन, जायंट गर्व्हनर, कॅव्हेंडिशी, ग्रॅडनैन, राजापुरी, बनकेळ, भरकेल, मुधेली, राजेळी, या जातींची केळी बाजारात येतात. मात्र, कोल्हापूरच्या बाजारात वेलची, हरिसाल, बसराई, सोनकेळी, वसई, जवारी, हेब्बाळी या जातींचीच केळी मोठी मागणी असल्याने येतात.

Web Title: Treasure trove

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.