अंबेनळी घाटातून प्रवास करताय... सावधान !
By Admin | Updated: July 21, 2014 23:10 IST2014-07-21T23:00:47+5:302014-07-21T23:10:04+5:30
महाबळेश्वर : गर्द धुके, पाऊस देतोय वाहनचालकांना चकवा

अंबेनळी घाटातून प्रवास करताय... सावधान !
महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरला पावसाळ्यात देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी व अंबेनळी असे दोन घाट आहेत. सध्या येथे पाऊस आणि गर्द धुके असल्यामुळे अंबेनळी घाटातून येणाऱ्या पर्यटकांबरोबरच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असणारा अंबेनळी घाट हा वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक मानला जातो. अरुंद रस्ता, चढ-उतार आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटात सतत लहान-मोठे अपघात होत असतात. अंबेनळी घाटातून महाबळेश्वरला येणाऱ्या नवख्या पर्यटकांची मात्र यामुळे फसगत होताना दिसते.
अंबेनळी घाट हा निसर्गसौंदर्याने नटला असल्याने काही हौशी पर्यटक या घाटातून प्रवास करतात; परंतु पावसाळ्यात या घाटातून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे असते. पावसामुळे या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत असतात. कित्येक वेळी गर्द धुक्यामुळे वळण नजरेस पडत नसल्याने चालकांची फसगत होऊन दुर्घटना देखील होतात. गेल्या वर्षभरात या घाटात लहान-मोठ्या किती तरी दुर्घटना झाल्या आहेत. दुर्घटनांमध्ये जीवित हानी झाली नसली तरी कित्येक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन घाटातून दरीत कोसळल्यास ते पुन्हा बाहेर काढता येईल की नाही, हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी पर्यटकांबरोबरच अन्य वाहनचालकांना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)
महाबळेश्वरला पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना गर्द धुके हे मुख्य कारण आहे. अंबेनळी घाटातून कोकणात दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. रस्ता अरुंद असल्याने बऱ्याच वेळेस घाटात वाहतूक खोळंबली जाते. तर काही वेळेस चालकांना अंदाज न आल्याने तीव्र उताराच्या वळणावर वाहनांवर नियंत्रण आणणे कठीण बनते. अशा वेळी अपघात झाल्यास धुक्यामुळे मदत कार्यातही मोठा अडथळा येत असतो. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तत्परते घटनास्थळी पोहोचून मदत करावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
याकडे लक्ष द्या...
-घाटात वाहनांचा वेग कमी ठेवणे
-गर्द धुके व पावसात प्रवास टाळावा
-अवजड साहित्याची वाहतूक टाळावी
-रात्रीच्या वेळी हेडलाईटला पिवळ्या
रंगाच्या जिलेटीन कागदाचा वापर करावा
-त्यामुळे धुक्यातून मार्ग काढणे सोपे जाते
काय हवे...
-रस्त्यावर रिफ्लेक्टर
-धोक्याच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक
-मजबूत कठडे
-जागोजागी हेल्पलाइन नंबर