संदीप आडनाईक/कोल्हापूर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज, दि. १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय घेतला आहे. तीन हजार रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू आहे. यासंदर्भातील आदेश गुरुवारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई कोल्हापूरच्या प्रकल्प संचालकांनी जारी केला आहे. कोल्हापूरच्या प्रवाशांसाठी (एमच-०९) हा निर्णय फायद्याचा आहे.
भारत सरकारच्या राजपत्र अधिसूचना क्र. का. आ. ३८८ (अ) दि. १७ जून २०२५ नुसार आणि मुख्य महाप्रंबधक (तक) दिल्ली यांच्या प्रमाणित कार्यपध्दती पत्र दि. ७ ऑगस्टर २०२५ रोजीच्या नोटीसीद्वारे १५ ऑगस्टपासून देशातील अव्यावसायिक (कार, जीप, व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टाेल (फास्टॅग) सुरु होत आहे. या पासची किंमत ३००० रुपये वार्षिक आहे. याचा कालावधी १ वर्ष किंवा २०० एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी, यापैकी जे आधी होईल ते लागू आहे. जी खासगी वाहने केवळ सुट्टी आणि सणाच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यांत जातात, त्यांना या सवलत योजनेचा फायदा होणार नाही. राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्यावाहनांना हा पास वापरता येणार आहे.
तीन जिल्ह्यातील टोलवर लागू
राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी ही सवलत वैध आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील किणी टोल प्लाझा, बोरगाव टोल प्लाझा आणि तासवडे टोल प्लाझावर हा वार्षिक टोल पास लागू हाेणार आहे.
लिंक आजपासून उपलब्ध
दरम्यान, पास काढण्यासाठीची लिंक आजपासून राजमार्ग यात्रा मोबाईल ॲप, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. पास मिळवण्यासाठी तसेच सक्रीय करणे आणि नूतनीकरण करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.