Kolhapur News: नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी, हर्षजित घाटगे यांच्याकडे कार्यभार
By भारत चव्हाण | Updated: March 28, 2023 18:38 IST2023-03-28T18:37:40+5:302023-03-28T18:38:42+5:30
पालिका वर्तुळात जोरदार चर्चा

Kolhapur News: नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी, हर्षजित घाटगे यांच्याकडे कार्यभार
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील खराब रस्त्यांबाबत राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार होताच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंताचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर सरनोबत यांच्याकडे जलअभियंता म्हणून कार्यभार देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे सहकुटुंब काल, रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शहरातील रस्त्यावर खड्डे दिसताच त्यांनी थेट प्रधान सचिवांनाच फोन करून त्याची माहिती दिली. राज्य सरकार रस्त्यांना पैसे देत असेल आणि निकृष्ट रस्ते होत असतील तर यात तुम्ही लक्ष घाला, अशी सूचना त्यांनी केली होती. याबाबत पालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.
अन् अखेर आज, सरनोबत यांची शहर अभियंता पदावरुन उचलबांगडी करत त्यांच्याकडे जलअभियंता म्हणून कार्यभार देण्यात आला. या बदलीमुळे मात्र पालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. याआधीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही सरनोबत यांच्याविषयी थेट प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या समक्ष तक्रार केली होती. त्यावेळी सरनोबत यांच्याकडील कार्यभार काढून घेण्यात आला नाही, मात्र सक्त ताकीद देण्यात आली होती.