व्यवहार बंद, तरीही रस्त्यावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:43+5:302021-05-08T04:25:43+5:30
कोल्हापूर : शहरातील भाजी मंडई बंद, बाजारपेठा बंद, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनातील उपस्थितीवर मर्यादा आल्या तरीही शुक्रवारी शहरातील ...

व्यवहार बंद, तरीही रस्त्यावर गर्दी
कोल्हापूर : शहरातील भाजी मंडई बंद, बाजारपेठा बंद, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनातील उपस्थितीवर मर्यादा आल्या तरीही शुक्रवारी शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. काहीही काम नसताना नागरिक सहज शहरातून चकरा मारत असल्याने ही गर्दी झाली होती.
कोल्हापुरात जनता कर्फ्यू लागू आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांना घरपोच सेवा देण्याचे तसेच भाजी विक्रेत्यांना दारोदारी जाऊन भाजी विक्री करण्याचे आवाहन महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी शहरातील सर्व दुकाने, भाजी मंडई बंद होत्या. त्यामुळे शहराच्या रस्त्यावरील वर्दळ कमी होणे अपेक्षित होते. मात्र चित्र वेगळेच होते. दुपारपर्यंत चारचाकी वाहने, दुचाकी मोठ्या संख्येने रस्त्यावर होत्या.
महानगरपालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने शुक्रवारी जीवनावश्यक दुकानाव्यतिरिक्त सुरू असलेली चार दुकाने सील केली. कोविड आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून जीवनावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू केल्यास ती सील करण्याची कारवाई सुरू आहे. तरीही कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता काही दुकानदार आपला व्यवसाय चालू ठेवत असल्याचे निदर्शनास आले.
शाहूपुरी येथील ब्युटी फॉर यू, लक्ष्मीपुरी येथील संतोष सायकल कंपनी, संतोष प्लॅस्टिक व गंजी गल्ली येथील महाराष्ट्र इलेक्ट्रिक दुकानांवर सीलबंदची कारवाई केली. ही कारवाई परवाना अधीक्षक रामचंद्र काटकर व कर्मचारी यांनी केली.