म्हशी, रेडकांना स्पर्धेसाठी सहा महिने अगोदर ट्रेनिंग, डायट प्लॅनही
By सचिन यादव | Updated: January 11, 2025 16:40 IST2025-01-11T16:39:47+5:302025-01-11T16:40:30+5:30
सचिन यादव कोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच ...

म्हशी, रेडकांना स्पर्धेसाठी सहा महिने अगोदर ट्रेनिंग, डायट प्लॅनही
सचिन यादव
कोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच अनेक मैदानी, मर्दानी खेळ जोपासले. त्याकाळी म्हशींच्या शर्यती हा प्रकार जन्माला आला. तो आजतागायत सुरू आहे. दिवाळी पाडव्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धा मे महिन्यापर्यंत घेतल्या जातात. त्याची तयारी सहा महिने आधी केली जात असून, लाखांची बक्षिसे स्पर्धेसाठी आहेत. जिल्ह्यातील हजारांहून अधिक म्हैस मालक यामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत या स्पर्धा लोकप्रिय ठरल्या आहेत.
स्पर्धेत रेडकू आणि म्हशी उतरविण्यासाठी सहा महिने आधी तयारी केली जाते. उच्चतम, मध्यम आणि सर्वसामान्य अशी तीन गटांत स्पर्धेचे वर्गीकरण केले जाते. सहा महिने ते सुमारे तीन वर्षे वय असलेले रेडूक आणि म्हैशी स्पर्धेत सहभाग घेतात. रेडकूसाठी एक किलोमीटर आणि म्हशीसाठी दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धा घेतल्या जातात. बाइकच्या पाठीमागून म्हशी पळविण्याचा थराराने आणि एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या म्हशी आणि बाइकचे ब्रेक थांबल्यावर जागेवर थांबून झपकन वळणाऱ्या म्हशींची थरारक कसरत पाहण्यासारखी असते.
रोज त्यांना ट्रॅकवर चालविणे, पाण्यात पोहणे, लाल कापड समोर धरून दुचाकीच्या मागे धावणे, मालकाच्या आवाजाची सवय केली जाते. त्यासह त्यांचा रोजचा `डाएट प्लॅन`ही ठरलेला आहे. दर्जेदार खुराक, रोज तीन ते सहा लिटर दूध, पेंड, भुसासह त्यांची आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. स्पर्धेच्या पूर्वी त्यांना योग्य तो आरामही दिला जातो. तीन हाकेत म्हैस बोलविण्यासाठी मालकाला खूप सराव करावा लागतो. खुर्चीवर उभे राहून अनेकदा पहिल्या हाकेतच म्हैस मालकाजवळ पोहोचते, हे एक वेगळेच कौशल्य असते.
स्पर्धेची व्याप्ती सध्या वाढली असून, टेम्पोमधून म्हशी नेल्या जाऊ लागल्या आहेत. म्हशींच्या शर्यतीमुळे महाराष्ट्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख तयार झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या स्पर्धा होत असून, दोन लाखांपर्यंतची बक्षिसे संयोजकांकडून दिली जात आहेत.
अनेक कुटुंबांचा भाग
राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात कणेरी मठ, उजळाईवाडी येथे मोठे गोठे होते. दिवस-रात्र केले जाणारे वैरणपाणी, सततचा सहवास यामुळे जनावरांनासुद्धा माणसांचा लळा लागतो. अनेक कुटुंबांचाच हा एक भाग बनला आहे.
स्पर्धेच्या प्रकारात बदल
काळानुरूप स्पर्धेच्या प्रकारात बदल झाला. त्या काळात एकदम सगळ्या म्हशी मालकांच्या पाठीमागे पळण्याची स्पर्धा होती. सर्वांत प्रथम येणारी म्हैस विजेती होत असे. याप्रमाणे क्रमांक ठरविले जात होते. त्यावेळी गवताच्या जाळावरून म्हैस उडी मारून पळविण्याचे, तसेच लपून म्हशीला बोलाविणे, दोन पायांवर बसणे, चौरंगावर बसणे असे कसरतीचे प्रयोग केले जायचे. सध्या दुचाकीमागून म्हैस पळविणे, दूर अंतरावरून तीन हाकेत म्हैस बोलाविणे, असे प्रकार रुजले. स्टॉप वॉचच्या साहाय्याने वेळ मोजून कमीत कमी वेळ हा क्रमांकासाठी निकष ठरविला.
माणूस आणि जनावरे यांच्यातील प्रेम वेगळे असते. परस्परांवर अवलंबून असलेले अवलंबित्व आणि गरज म्हणून जनावरे आणि मालकांचे ऋनानुबंध अधिक घट्ट होतात. दुचाकीच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर कै. मनोहर पाटील यांनी सन १९५९ मध्ये म्हैस जवळ बोलावून दाखविली. त्यानंतर हा प्रकार जिल्ह्यात रूढ झाला. - राजू पाटील, बुधवार पेठ, संचालक कोल्हापूर जिल्हा म्हैस धारक असोसिएशन