‘वैकुंठभाई मेहता’संस्था प्रशिक्षणार्थींची ‘केडीसीसी’ला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:52+5:302021-02-05T07:13:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हा बँकेला भेट दिली. ‘आंतरराष्ट्रीय ...

‘वैकुंठभाई मेहता’संस्था प्रशिक्षणार्थींची ‘केडीसीसी’ला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हा बँकेला भेट दिली. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान’ या विषयावर ही अभ्यास भेट होती. या भेटीत केंद्र सरकारच्या वित्त विभागांतर्गत सेंटर फॉर इंटरनॅशनल को-ऑपरेशन अँड ट्रेनिंगच्या वतीने कृषी क्षेत्रातील कार्यरत बँकांसाठी ही अभ्यासभेट होती.
या अभ्यासभेटीत भारतासह बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, भूतान या देशांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, डेहराडून, लखनऊ येथील प्रशिक्षणार्थ्यांचा समावेश होता. बँकेच्या वतीने संचालक विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, असिफ फरास यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे स्वागत केले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी बँकेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. वैकुंठभाई मेहता प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक वाय. एस. पाटील म्हणाले, १९९८ साली एटीएम सुरू करणारी केडीसीसी ही देशातील पहिली जिल्हा बँक आहे. त्यापाठोपाठ एटीएम, सीईआरएम, मायक्रो एटीएम सेवा, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅन, स्वतःचे डाटा सेंटर, स्वतःचे सॉफ्टवेअर ही वाटचाल क्रांतिकारक आहे. नागपूरच्या सहकार प्रशिक्षण संस्थेचे संचालक बी. व्ही. नाईक, नेपाळचे खुमलाल न्योपेन, बंगलोरचे डी. कुमारस्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.
कौतुक बँक पदाधिकाऱ्यांचे
प्रशिक्षण केंद्राचे सल्लागार डी. रवी म्हणाले, बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या पाच वर्षांत गरुडझेप घेतली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही काटकसरीचा, पारदर्शी कारभार करून, प्रसंगी कर्जवसुलीसाठी सनई-चौघडा घेऊन गांधीगिरीच्या मार्गाने उच्चांकी केलेली वसुली काैतुकास्पद आहे.
फोटो ओळी :
पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यानी कोल्हापुरातील ‘केडीसीसी’ बँकेला अभ्यासभेट दिली.
(फोटो-०३०२२०२१-कोल-केडीसीसी)