बारा बलुतेदारांची परंपरा जपणारे वंदूर

By Admin | Updated: October 18, 2015 23:42 IST2015-10-18T22:19:59+5:302015-10-18T23:42:11+5:30

गावची पंरपरा म्हणून ज्या त्या घरातील लोक विशेषत: सुशिक्षित तरुणही मानकरी म्हणून यात सहभागी होतात. हेच या वंदूर गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य आहे.

The tradition of the twelve Balutadars | बारा बलुतेदारांची परंपरा जपणारे वंदूर

बारा बलुतेदारांची परंपरा जपणारे वंदूर


कागल तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. राजघराण्याबरोबर सरदार, मनसबदार, वतनदार अशी विभागणी गावागावांत पाहावयास मिळते. एकेकाळी गावगाडा चालविणारे हे घटक
बारा बलुतेदार-अठरा आलुतेदारांच्या सहकार्यातून हा गावगाडा हाकत. त्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांमध्ये या सर्वच घटकांना मानपान असे. आज गावचा कारभार या मंडळींच्याकडे नाही. मात्र, वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक सण-उत्सवात ही पंरपरा भक्तिभावाने जपली जाते. वंदूर (ता. कागल) येथे पांरपरिक पद्धतीने साजरा होणार दसरा उत्सव बारा बलुतेदार-अठरा आलुतेदारांची परंपरा स्पष्ट करतो.इतिहासकालीन घाटगे घराणे प्रसिद्ध आहेच; मात्र कागलकर घाटगे यांच्याबरोबर केनवडेकर घाटगे, वंदूरकर घाटगे अशी ही भाऊबंदकी आहे. वंदूरच्या वतनदारांना सर्जेराव घाटगे म्हणत. आजही दसरा आणि इतर उत्सवांत सर्जेराव घाटगे, खातेदार सरकार म्हणून शिवसिंह विजयसिंग घाटगे यांना मान दिला जातो. पाच एकर परिसरात घाटगेंचा वाडा आहे. ग्रामदैवत हनुमान आहे. गावच्या पारंपरिक रचनेत संपूर्ण गावच या वाड्याभोवती वसलेले आहे. गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य हे की, वतनदार, खातेदार या संकल्पना भारतीय स्वातंत्र्यानंतर संपुष्टात आल्या; पण परंपरा म्हणून या सण-उत्सवात त्या पाळल्या जातात. यामध्ये हिंदंूच्याबरोबर मुस्लिम मानकरीही आपापली भूमिका पार पाडतात. शिकलगार वाड्यातील जुनी हत्यारे स्वच्छ करून धार करून देतात. तब्बलजी ढोल, ताशे, नगारे वाजविण्यासाठी सज्ज राहतात. कोरवी सनई, पारंपरिक पेटीबाजा वाजवितात. हशमदार म्हणून नलावडे तलवार घेऊन मिरवणुकीत पुढे असतात. परीट समाजाकडे ध्वज (पांढरे निशाण) असतो. गावचे पाटील जे लिंगायत पाटील आहेत ते पालखीवर चौरी ढाळतात. आंबी लोक अब्दागिरी पकडतात. मशाल, दिवटी नाभिक समाजाकडे असते. पालखीला खांदा सुतार, लोहार देतात. दलित समाजाकडे तराळकी असते. गुरव हे पुजारी, तर जंगम स्वामी शिवलिंग पूजा, ब्राह्मण मुखपूजा, शिलंगण अशी ही विभागणी असते. नवरात्रीचे नऊ दिवस घाटगे वाड्यापासून सर्जेराव खातेदारांना वाजत-गाजत आणले जाते. आरतीनंतर परत सोडले जाते. दसऱ्या दिवशी गावात देवाची जंगी पालखी मिरवणूक निघते. गावच्या वेशीबाहेर शिलंगणाच्या माळावर सर्जेराव खातेदारांच्या हस्ते पूजा होऊन त्यांनी बंदुकीच्या फैरी हवेत उडविल्या की ग्रामस्थ सोने लुटतात. दसऱ्यानंतर येणाऱ्या मंगळवारी या सर्व मानकऱ्यांना सर्जेराव खातेदार जेवण देतात. त्यासाठी धनगर समाज बकरी देतो. आज काळ बदलला आहे. बारा बलुतेदार-अठरा आलुतेदार ही संकल्पना ऱ्हास होत आहे. तरीसुद्धा गावची पंरपरा म्हणून ज्या त्या घरातील लोक विशेषत: सुशिक्षित तरुणही मानकरी म्हणून यात सहभागी होतात. हेच या वंदूर गावच्या दसऱ्याचे वैशिष्ट्य आहे.
- जहाँगीर शेख

Web Title: The tradition of the twelve Balutadars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.