तळकट वनोद्यान पर्यटकांचे आकर्षण

By Admin | Updated: July 20, 2014 22:13 IST2014-07-20T21:58:11+5:302014-07-20T22:13:02+5:30

पर्यटनास मिळणार चालना : पायाभूत सुविधांची वानवा ; प्राणी निरीक्षणाचे उभारलेत मनोरे

Tourist attraction of underwater forests | तळकट वनोद्यान पर्यटकांचे आकर्षण

तळकट वनोद्यान पर्यटकांचे आकर्षण

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग
तळकट वनबागेत विविध वनौषधी, विविध जातीचे दुर्मीळ पक्षी, प्राणी अशी वनसंपदा विपुल प्रमाणात असल्याने हे उद्यान पर्यटनदृष्ट्या आकर्षण ठरत आहे. या वनबागेतील जंगली प्राणी सहज, सुलभरित्या पाहता यावेत, यासाठी प्राणी निरीक्षण मनोरे उभारण्यात आल्याने एकप्रकारे पर्यटनास चालना मिळाली आहे.
दोडामार्ग तालुक्यापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळकट येथील वन उद्यान फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. वनविभागाला लागूनच असल्याने या बागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बागेत विविध वनौषधी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे सुपारीची झाडे, आंबा कलमे, कोकम, नारळ इत्यादी उपयुक्त झाडांनी ही बाग बहरली आहे. त्यामुळे या बागेला वनबाग म्हणून नाव पडले. सद्यस्थितीत या बागेला ‘वनउद्यान’ म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुका अस्तित्वात येण्यापूर्वी सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी वनविभाग हद्दीतील हे तळकट वनउद्यान प्रसिद्ध होते. या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले होते. या संपूर्ण परिसरात या बागेशिवाय अन्य मनोरंजनाचे साधन असल्याने सावंतवाडी तालुक्यातूनही जिल्हा परिषद शाळा, तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहली येथे आणल्या जात असत. अशावेळी पक्षांबरोबरच विद्यार्थ्यांच्याही किलबिलाटाने ही बाग फुलून जात असे. आजही ही परिस्थिती बदललेली नाही. मनोरंजनाबरोबरच विविध वनौषधीचीही माहिती विद्यार्थ्यांना येथे मिळत असे. यासाठी प्रत्येक झाडावर माहितीचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या सहली मनोरंजन आणि ज्ञान या दोन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेने सफल होत असत.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वनोद्यानामध्ये २० लाख रुपये खर्च करून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
पर्यटकांना निवांत मिळण्यासाठी षट्कोनी घरकुल उभारण्यात आली आहेत. तसेच प्राणी आणि पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी प्राणी निरीक्षण मनोरेही उभारण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी तर येथे विविध प्राणी पहावयास मिळतात. या वनउद्यानामध्ये जंगली प्राण्यांबरोबरच पट्टेरी वाघांचेही अस्तित्व आढळून आल्याने प्राणीमित्रांसाठी ही बाग आकर्षण ठरत आहे.
४ पर्यटकांसाठी अनेक सुविधा असल्या, तरी काही सुविधांची उणीव येथे आहेच. या वनउद्यानामध्ये राहण्यासाठी निवासी घरकुल नाही. तसेच चहानाष्टा, साफसफाई, पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईडस्, वीज आदी मुख्य सोयींची येथे अद्यापही वानवा आहे. या मुख्य समस्या वनक्षेत्रपाल यांनी लक्ष घालून सोडविल्यास या वनउद्यानास पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त होणार असून पर्यटनाच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले होऊ शकते.

Web Title: Tourist attraction of underwater forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.