जिल्ह्यात एकूण २,०८२ अर्ज
By Admin | Updated: February 6, 2017 23:48 IST2017-02-06T23:48:37+5:302017-02-06T23:48:37+5:30
सर्वच ठिकाणी गर्दी : जिल्हा परिषदेसाठी अंतिम दिवशी ४७२, तर पंचायत समित्यांसाठी ८४९ अर्ज दाखल

जिल्ह्यात एकूण २,०८२ अर्ज
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सातारा जिल्ह्यात विक्रमी १,३२१ अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ४७२ तर पंचायत समित्यांसाठी ८४९ अर्जांचा समावेश आहे. दोन्हींसाठी एकूण २,०८२ अर्ज दाखल झाले आहेत.
सातारा जिल्ह्यातील राजकारणाने गेल्या पंधरा दिवसांत कलाटणी घेतली आहे. उमेदवार फोडाफोडी अन् बंडखोरीचे ग्रहण लागल्याने सर्वच पक्षांनी शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत संथगतीने अर्ज दाखल केले होते.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी एका दिवसात ४७२ अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण ७६० अर्ज दाखल झाले आहेत.
अकरा पंचायत समित्यांसाठी एका दिवसात ८४९ अर्ज दाखल झाल्याने हा आकडा १,३२२ वर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक साताऱ्यात १३८ त्या खालोखाल कऱ्हाडमधून १६६ अर्ज दाखल झाले. (प्रतिनिधी)
नेत्यांचे बंधू-पुत्रही मैदानात!
जावळी तालुक्यातील कुडाळ गटात आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तसेच कऱ्हाड तालुक्यातील सुपने गटात आमदार आनंदराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. फलटणमध्ये संजीवराजे, शिवांजलीराजे हेही मैदानात उतरले असून, येळगाव गटात उदयसिंह विलासराव उंडाळकर यांनीही शड्डू ठोकला आहे.
आॅनलाईन
अडीच हजार अर्ज
या निवडणुकीत प्रथमच आॅनलाईन अर्ज भरावे लागत होते. आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी लागत होती. त्यामुळे पंचायत समित्यांसाठी २,४७९ तर जिल्हा परिषदेसाठी १,४६९ अर्ज आॅनलाईन भरले होते.