उद्या ‘रंगबहार’तर्फे ‘मैफल रंगसुरांची’
By Admin | Updated: January 17, 2015 00:34 IST2015-01-17T00:34:01+5:302015-01-17T00:34:44+5:30
टाऊन हॉलमध्ये आयोजन : वीस कलाकार; बी. आर. टोपकरांना ‘रंगबहार जीवनगौरव’ने सन्मानित करणार

उद्या ‘रंगबहार’तर्फे ‘मैफल रंगसुरांची’
कोल्हापूर : कलातपस्वी आबालाल रेहमान आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्मृतिनिमित्त ‘रंगबहार’ संस्थेतर्फे रविवारी (दि. १८) ‘मैफल रंगसुरांची’ कार्यक्रम होणार आहे. येथील टाऊन हॉल उद्यान येथे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत चित्रकार-शिल्पकारांच्या कलाकृती, शास्त्रीय गायन आणि सतारीच्या सुरांची मैफल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये वीस कलाकार सहभागी होणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असतील. कलाकार बी. आर. टोपकर यांना ‘रंगबहार जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
शून्यातून शिखर गाठलेला कलाकार...
कोल्हापूर : शांत स्वभाव, पण मनमोकळं बोलणं, सभ्यता सोबत कष्ट करण्याची प्रचंड जिद्द, हार न मानता परिस्थितीशी झगडत नशीब बदलणं हे सगळं माझ्या आजोबांना अवगत आहे. आण्णांचा जन्म कलेसाठी झाला आणि कलाकार म्हणूनच ते जन्माला आले. कला ही देवाची देणगीच आहे. ते लहान वयातही शाळेत शिक्षकांकडून सुंदर चित्र रेखाटून कौतुक करून घ्यायचे. आत्मविश्वासाच्या जोरावर कलेची वाट धरण्याचा त्यांचा निर्णय तसा टोपकर घराण्यात नवीनच होता. स्वत:वर आणि कलेवर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले. शून्यातून यशाचे शिखर गाठताना दत्तोबा दळवींसारखे दिग्गज गुरू, ठाकूर आणि महाजनींसारखे गुरुबंधू त्यांना मिळाले. इम्प्रेशननिस्ट आर्ट शैली जोपासताना आण्णांनी टाईम स्केचेस, व्यक्तिचित्रे, लँडस्केप आणि म्युरल्स यांवरही मास्टरी मिळवली. त्यांची आणखी एक खुबी म्हणजे काष्ठशिल्पकला. १९५१ मध्ये पुण्यात प्रथम हालत्या चित्रांचे प्रदर्शन सादर करून ते हालत्या चित्रांचे जनक बनले. त्यात आण्णांनी महात्मा गांधी, झाशीची राणी, छ. शाहू महाराज, छ. शिवाजी महाराज, यांचे चरित्र तसेच भारताचा विकास हा विषय मांडून समाजप्रबोधन कार्यास हातभार लावला. जीवनात जितकी कलेची साथ होती, तितकाच अॅलर्जीचा अडथळाही होता; पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही. ५० वर्षे अॅलर्जीशी झगडून त्यांनी जिवंत रंगांनी सजवले, शिल्पांनी बहरले
आणि हालत्या चित्रांनी परिपूर्ण केले.
- ऋग्वेदा टोपकर (कोल्हापूर)