कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू ठेवण्यावरून टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:46+5:302021-05-07T04:24:46+5:30
कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे, खते विनाव्यत्यय उपलब्ध व्हावीत म्हणून राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिवसभर केंद्र सुरू ठेवण्याबाबत ...

कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू ठेवण्यावरून टोलवाटोलवी
कोल्हापूर : खरीप हंगाम तोंडावर असल्याने बियाणे, खते विनाव्यत्यय उपलब्ध व्हावीत म्हणून राज्याच्या कृषी आयुक्तांनी दिवसभर केंद्र सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे लेखी आदेश काढले होते. याला आठ दिवसांचा कालावधी लाेटला तरी अद्याप टोलवाटोलवी सुरू असल्याने शेतकऱ्यांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणे शक्य नसल्याचे सांगत आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्गदर्शन करावे, असे सांगत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने १५ मे पर्यंत सुरू असलेल्या जनता कर्फ्यूअंतर्गत सकाळी ७ ते ११ या वेळेतच अत्यावश्यक खरेदीला मुभा दिला आहे. कृषी सेवा केंद्रेही याच वेळेत खुली राहतात. वास्तविक सकाळची वेळ ही शेतकऱ्यांसाठी शिवारात राबण्यासाठीची असते. उन्हाचा तडाखा कमी असल्याने याचवेळी कामे होतात. खरेदी असल्यास सहसा दुपारीच होते; पण ११ ला दुकाने बंद करण्याच्या नियमामुळे शेतकऱ्यांची धावाधाव सुरू आहे.
खरीप हंगाम हा सर्वांत मोठा असल्याने आणि प्रत्यक्ष पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचाच कालावधी राहिल्याने आता ही वेळ शेतकऱ्यांबरोबरच कृषी सेवा केेंद्र चालकांसाठी लगीनघाईसारखीच असते; पण नेमके याच वेळी निर्बंध लावल्याने वर्षानुवर्षांचे चक्रच विस्कळीत झाले आहे. यातून मार्ग काढून सवलत द्यावी अशी मागणी होत होती. याची दखल घेत कृषी आयुक्तांनी आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, आज उद्या करत याच्या अंमलबजावणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यात कोराेनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने दिवसभराची मुभा देणे धोक्याचे ठरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे.
चौकट
जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र : दोन लाख २६ हजार हेक्टर
एकूण कृषी सेवा केंद्रे : १८७२
प्रतिक्रिया
कृषी आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर लगेचच याबाबतीतील निर्णय घेतला जाईल.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी