टोलप्रश्नी आज मुंबईत बैठक

By Admin | Updated: November 18, 2015 00:01 IST2015-11-17T23:50:09+5:302015-11-18T00:01:25+5:30

चंद्रकांतदादा पाटील : मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

Toll questions today in Mumbai | टोलप्रश्नी आज मुंबईत बैठक

टोलप्रश्नी आज मुंबईत बैठक

कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी आज, बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ही बैठक मंगळवारी होणार होती; परंतु ती आता आज होत आहे.
मंगळवारी पालकमंत्री पाटील यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मोप्पलवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी सुमारे दोन तास चर्चा केली. या प्रकरणाचा सुवर्णमध्य काय असू शकतो, यासंबंधीच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. आज, बुधवारी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यासंबंधी चर्चा करून नोव्हेंबरअखेरीस हा प्रश्न संपवू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
कोल्हापुरात ‘आयआरबी’ कंपनीने २४० कोटी रुपये खर्चून केलेल्या एकात्मिक रस्ते प्रकल्पाची किंमत किती व कुणी द्यायची हा निर्णय सध्या प्रलंबित आहे. राज्य शासनाने महापालिका निवडणुकीच्या आधी टोलवसुलीस तीन महिन्यांची स्थगिती दिली. तिची मुदत येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ही मुदत संपल्यावर कंपनी पुन्हा टोलवसुली सुरू करणार काय, ही साशंकता टोलविरोधी कृती समितीला व लोकांच्याही मनात आहे; परंतु पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र कोल्हापुरात पुन्हा टोल लागू होणार नाही, असे निक्षून सांगितले आहे.
या वादग्रस्त प्रकल्पाबद्दल तक्रारी झाल्यावर शासनाने वेळोवेळी सहा समित्या स्थापन केल्या. त्यांचे अहवालही शासनाकडे सादर झाले आहेत. कंपनीला ठरावीक रक्कम उचलून देऊन कोल्हापूरची टोलमधून मुक्तता करण्याचा शासनाचा निर्णय आहे; परंतु ही ठरावीक रक्कम म्हणजे किती, ती द्यायची झाली तर कशी देणार, ती कंपनीला मान्य होईल का, अशा काही प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांसमवेतच बैठक होणार होती; परंतु काही कारणांमुळे ही बैठक मंगळवारी झाली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Toll questions today in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.