भीमगोंडा देसाई कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम कोकणातून आंबा घाटापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे कोकणातून आंब्यापर्यंत वाहने सुसाट ये-जा करीत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात महामार्गाचे काम संथ गतीने होत आहे. या महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील आवळी आणि शिरोली - बसवनखिंड येथे टोल नाका होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीस सन २०२६अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणी सुरू होणार आहे.महामार्ग क्रमांक १६६ या १३४ किलोमीटरचे काम सन २०२३मध्ये सुरू झाले. महामार्ग नागपूरपासून सांगलीपर्यंत पूर्ण झाला आहे. सांगली - अंकली ते चोकाकपर्यंत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचा मोबदला किती मिळणार हे अजून शासनाने जाहीर केलेले नाही. संबंधीत शेतकरी महामार्गास जमीन देण्यास तयार नाहीत. काम बंद आहे.चोकाक ते आंब्यापर्यंतचे काम सुरू आहे. पण, सध्या पाऊस अधिक असल्याने आणि डोंगर पोखरून अजस्त्र पूल बांधले जात असल्याने कामाला अपेक्षित गती देता आलेली नाही, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे. पहिल्या टप्प्यातील रत्नागिरीत मिऱ्या बंदर ते आंबापर्यंतचा रस्ता पूर्ण होत आला आहे. यामुळे कोकणातून वाहनधारक आंबापर्यंत गतीने ये-जा करीत आहेत.
सांगली-कोल्हापूर रस्ताही महामार्गातसांगली - कोल्हापूर रस्ताही नागपूर - रत्नागिरी महामार्गात विलीन झाला आहे. हा ५२.६१ किलोमीटरचा रस्ता पूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 'बांधा, वापरा, हस्तातंरीत करा' (बीओटी) या तत्त्वावर तयार करण्यासाठी खासगी कंपनीस सरकारने ठेका दिला होता. ठेकेदाराने २०१४ पर्यंत ६० टक्के काम केले. दरम्यान, कोल्हापूर शहरात टोल बंदीसाठी व्यापक आंदोलन झाले. त्यातून सरकारने शहरातून टोल हद्दपार केल्याची घोषणा केली. त्यानंतर या रस्त्यावरील प्रस्तावित टोलनाक्यास विरोध झाल्याने ठेकेदार कंपनीने गाशा गुंडाळला. काम रद्द झाल्याने हा रस्ता महामार्ग प्राधीकरणकडे वर्ग झाला. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद होऊन ठेकेदार निश्चित झाला आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू होईल, असे महामार्ग प्रशासनाचे म्हणणे आहे.
..येथे होणार टोलनाके
- आवळी (ता. पन्हाळा)
- शिरोली - बसवनखिंड (ता. हातकणंगले)
दृष्टीक्षेपातील जिल्ह्यातील महामार्ग
- आंबा ते पैजारवाडी - ४५.२०० किलोमीटर
- पैजारवाडी ते चोकाक - ३२.९६० किमी.
- रूंदी - ४५ मीटर
- मंजूर निधी - ५,६९८ कोटी
- जिल्ह्यातील बाधित गावे : ४९
- जमीन संपादीत झालेल्या शेतकऱ्यांची संख्या - १२,६०८