टोलविरोधी लढा, विद्यार्थ्यांना आवाहन
By Admin | Updated: January 14, 2015 23:19 IST2015-01-14T23:00:49+5:302015-01-14T23:19:27+5:30
निवास साळोखे : महावीर कॉलेजमध्ये व्याख्यान

टोलविरोधी लढा, विद्यार्थ्यांना आवाहन
कोल्हापूर : टोलमुक्ती हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. टोलमुक्त झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. राज्यात अडीच महिने झाले नवीन भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनी टोलप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत टोल घालवणारच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी येथे केले.
महावीर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘कोल्हापूर शहर रस्ते विकास आणि टोल आंदोलन दशा व दिशा एक भौगोलिक अभ्यास’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य संभाजीराव कणसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मंजिरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नाथाजी पोवार उपस्थित होते.
निवास साळोखे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून आम्ही चळवळीत काम करीत आहोत. त्यामुळे टोल आंदोलन हे काय नवीन वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत या आंदोलनातून समितीतील कार्यकर्त्यांवर दरोड्यासारखे गुन्हे पोलीस प्रशासनाने घातले. आम्ही तुम्हाला दरोडेखोर वाटतो का? असा प्रश्न करून ते म्हणाले, आय.आर.बी. कंपनी खंडणीप्रमाणे पैसे गोळा करत आहे. कंपनीला ठेका देण्यासाठी मंत्रालयापासून महापालिका आणि मंत्र्यांपासून ते शिपायापर्यंत अशी साखळी आहे. या साखळीद्वारे हा कारभार सुरू आहे. यातून मंत्री आपली दिवाळी तर कोल्हापूरकरांचा शिमगा होत आहे. गत काँग्रेस आघाडी सरकारमधील जिल्ह्णातील दोन मंत्री यांनी विधानसभेपूर्वी टोल पंचगंगेत बुडवू असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी टोल मुक्ती केली नाही. त्यांना जनतेने जागा दाखविली. परंतु, सध्या राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अद्याप टोलमुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा लवकरच टोलमुक्ती करावी अन्यथा त्यांना भविष्यात त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा साळोखे यांनी दिला.
प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.