हद्दवाढ समर्थनार्थ आज मेळावा
By Admin | Updated: September 3, 2016 00:55 IST2016-09-03T00:48:55+5:302016-09-03T00:55:53+5:30
आंदोलनाची दिशा ठरवणार : धनंजय महाडिक, सतेज पाटील यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न

हद्दवाढ समर्थनार्थ आज मेळावा
कोल्हापूर : राज्य सरकारच्या भरवशावर शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी आग्रही राहिलेल्या सर्वपक्षीय कृती समितीचा भ्रमनिरास झाल्यानंतर आता यापुढे कोणती भूमिका घ्यावी, यावर विचारविनियम करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज, शनिवारी दुपारी चार वाजता कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वपक्षीय मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहावे म्हणून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत होता. परंतु, तो झाला नसल्याने त्यांच्या उपस्थितीबद्दल अनिश्चितता आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून शहराची हद्दवाढ रखडली आहे. सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिले होते. परंतु, हद्दवाढविरोधी कृती समितीचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांच्या विरोधामुळे हद्दवाढीच्या प्रस्तावाला बगल देत त्यांनी शहरालगतच्या गावांसाठी विकास प्राधिकरणाचा पर्याय दिला. सरकारमधील दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांनी अनपेक्षित ‘यु टर्न’ घेतल्याने शहरात तीव्र नाराजी उमटली आहे.
हद्दवाढविरोधी कृती समितीने राज्य सरकारने दिलेल्या पर्यायाचे स्वागत केले असले तरी तो स्वीकारलेला नाही. सर्वपक्षीय शहर हद्दवाढ समितीने तर तो अमान्य केला आहे. त्यामुळे विकास प्राधिकरणाबाबत कमालीची संभ्रमावस्था आहे. म्हणूनच दोन्ही समित्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळावे घेऊन जाहीर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याचे निश्चित केले आहे.
सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांना निमंत्रण
सर्वपक्षीय शहर हद्दवाढ कृती समितीने आज दुपारी चार वाजता महानगरपालिकेच्या ताराराणी सभागृहात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते, सर्व आजी-माजी महापौर, नगरसेवक यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मेळाव्यास बोलविण्याचा विचार पुढे आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देण्यासाठी संपर्क साधण्यात येत होता; पण तो झाला नाही. त्यामुळे ते मेळाव्याला येणार की नाही, हे रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर अश्विनी रामाणे व माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले आहे.