जिल्ह्यातील निर्बंधाबाबत आज निर्णय, व्यापारी ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:51+5:302021-06-27T04:17:51+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील निर्बंध आज रविवारी जाहीर करण्यात येणार ...

जिल्ह्यातील निर्बंधाबाबत आज निर्णय, व्यापारी ठाम
कोल्हापूर : राज्य शासनाने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील निर्बंध आज रविवारी जाहीर करण्यात येणार आहेत. व्यापारी मात्र उद्या सोमवारपासून दुकाने व व्यवसाय सुरू करण्यावर ठाम आहेत.
कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या जास्त असल्याने अन्य जिल्ह्यात अनलॉक केल्यानंतर देखील येथील स्तर ४ मधील निर्बंध कायम आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी निर्बंध शिथिल करू नये अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे; मात्र गेली अडीच महिने व्यवसाय बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यात राज्य शासनाने डेल्टा प्लसच्या धर्तीवर निर्बंध कडक केले असून त्यानुसार जिल्ह्यात नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र हे निर्बंध नेमके कोणते असतील हे आज रविवारी कळणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याचा आदेश काढण्यात येणार आहे. प्रशासनाचा निर्णय काहीही असो आम्ही सोमवारपासून व्यवसाय सुरू करणार आहोत असा निर्धार व्यावसायिकांनी केला आहे.