corona virus-टोबॅको सेंटरमधून खुलेआम तंबाखूची विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:45 IST2020-03-21T16:42:52+5:302020-03-21T16:45:31+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको सेंटरवाल्यांकडून उचलला जात आहे. जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर शनिवारी उघडी ठेवून या दुकानदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच धाब्यावर बसविले.
कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको सेंटरवाल्यांकडून उचलला जात आहे. जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्या पानपट्टी व दुकाने यांना बंदीचे आदेश दिले होते. त्याची शुक्रवारपासून अंमलबजावणीही सुरू झाली.
पानपट्टीचालकांनी स्वत:हून पानपट्ट्या बंद केल्या. तर काही सुरू असणाऱ्या पानपट्ट्यांवर प्रशासनाकडून कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु लक्ष्मीपुरी येथील होलसेल दराने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ होलसेल दरात विक्री करणारी दुकाने सुरूच राहिली.
शनिवारीही हेच चित्र होते. एका बाजूला पानपट्ट्या बंद झाल्याने याचा फायदा नाष्टा सेंटर व किरकोळ दुकानदारांनी घेतला. त्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू ठेवली. त्याचबरोबर टोबॅको सेंटरही खुली असल्याने पानपट्ट्यांचे ग्राहक तिकडे वळाले.
त्यामुळे या दुकानांसमोर खरेदीसाठी गर्दी दिसत होती. यावरून आम्ही कोणालाही जुमानत नाही, असा पवित्रा घेत होलसेल दुकानदारांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला आव्हान दिले आहे. पानपट्ट्या उघड्या ठेवल्या म्हणून कारवाई करत थेट गुन्हे दाखल करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन यंत्रणेला ही होलसेल दुकाने दिसत नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.