हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्यासाठी टाईमबॉण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST2021-01-10T04:18:47+5:302021-01-10T04:18:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेची दखल घेऊन राज्यातील सर्वच हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्यासाठी ...

हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्यासाठी टाईमबॉण्ड
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेची दखल घेऊन राज्यातील सर्वच हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्यासाठी टाईमबॉण्ड दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरातील सर्वच हॉस्पिटलचे ऑडिट तात्काळ करण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी दाैलत देसाई यांना केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सायंकाळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या मुलीच्या स्वागत समारंभासाठी अल्प काळासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, भंडारा येथे घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. तात्काळ भंडारा रुग्णालयाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. औरंगाबाद नामांतराबाबत विचारले असता, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बसून यावर मार्ग काढतील, असे ते म्हणाले. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.