चाऱ्याअभावी शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ
By Admin | Updated: June 3, 2015 01:00 IST2015-06-03T00:39:17+5:302015-06-03T01:00:39+5:30
तीव्र टंचाई : शिरोळ तालुक्यात पशुखाद्यांसह चाऱ्याचे दर गगनाला

चाऱ्याअभावी शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ
गणपती कोळी - कुरूंदवाड -बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम् बनला आहे. मुख्य पीक उसासह इतर सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारा येथील शेतकरी पशुधनातही आघाडीवर आहे. मात्र, ऊस गळिताचा हंगाम संपल्यापासून चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पशुखाद्यांबरोबर ओल्या चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चाऱ्याअभावी येथील शेतकऱ्यांना पशुधन विकण्याची वेळ येत आहे.
तालुक्याला कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा याचारही नद्यांनी वेढा दिल्याने शेती ओलिताखाली आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन अन् कष्टाची तयारी यातून येथील शेतकरी काळ्या आईच्या पोटातून सोने पिकवित आहे. मुख्य पीक उसाबरोबरच भाजीपाला, फळभाजी, द्राक्ष, आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे. आदर्शवत शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनातून दुग्ध व्यवसायातही आघाडीवर आहे.
उसाला चांगला भाव मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्याचा परिणाम ओल्या चाऱ्यावर झाला. ऊस गळीत हंगामात ओल्या चाऱ्याची मुबलकता असते. मात्र, हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे दुग्धजन्य जनावरांची संख्या जास्त असल्याने व शेतीमध्ये ओला चारा नसल्याने चाऱ्याविना जनावरांचे हाल होत आहे.
सरकी पेंड, गोळी पेंड, गहू भुसा, कडबाकुट्टी या पशुखाद्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. चारा बाजारात एक पेंडी उसाच्या चाऱ्याला शंभर ते सव्वासे रुपये, तर मूठभर गवताच्या पेंढीला १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. दुग्ध व्यवसायातून बेरजेचे गणित मांडणाऱ्या शेतकऱ्यांचे महागडा चारा व पुशखाद्यामुळे गणितच चुकले आहे.
शेतात उभा ऊस असला तरी
या उसावर सेवा सोसायटी, बॅँकांचे भरमसाठ कर्ज घेतल्याने आपल्या जनावरांसाठी ऊस तोडण्याचे
धाडसही होत नाही अन् चाऱ्याअभावी जनावरांचे हालही पाहवत नसल्याने आपल्या जनावराला बाजार दाखवून
गोठा रिकामा करावा लागत आहे.