यंदा मिरचीचा ठसका कमी लागणार
By Admin | Updated: February 17, 2017 01:15 IST2017-02-17T01:15:42+5:302017-02-17T01:15:42+5:30
मिरच्यांचे दर ३० टक्क्यांनी खाली : आंध्र प्रदेश, कर्नाटकातून दररोज तीन ट्रक आवक

यंदा मिरचीचा ठसका कमी लागणार
कोल्हापूर : यंदा चटणी झणझणीत झाली तरी ग्राहकांना दराचा ठसका कमी लागणार आहे; कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या दरात यंदा ३० ते ४० टक्के घसरण झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकातून विविध जातींच्या मिरच्यांची दररोज तीन ट्रक भरून आवक होऊ लागली आहे. यासह चटणी कांडपासाठी पेठापेठांमधील दळप-कांडप यंत्रांवरही गर्दी दिसू लागली आहे.
कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी म्हणून कोल्हापूरच्या चटणीला राज्यासह परराज्यांतही मोठी मागणी आहे. या कोल्हापुरी चटणीसाठी खास लवंगी व ब्याडगी मिरची या दोन जातींच्या मिरच्या एकत्र करून बनविलेल्या चटणीला अर्थातच ‘कोल्हापुरी चटणी’ला बाजारात मोठी मागणी आहे. सद्य:स्थितीत कोल्हापुरात आंध्रप्रदेशातून गुंटूर व चवीसाठी व किमतीतही चढा दर मिळणारी संकेश्वरी जवारी, लालभडक रंगासाठी काश्मिरी जातीच्या मिरच्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नित्यनियमाने उन्हाळ्याची चाहूल लागताच कोल्हापुरातील बहुतांश घरांमध्ये मसाले भाजण्याचा घमघमाट सर्वत्र सुटतो. तो सुरू झाला की समजायचे, वर्षाच्या चटणीची तयारी सुरू झाली! याच काळात राज्यासह परराज्यांतून विविध जातींच्या व चवींच्या मिरच्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, कपीलतीर्थ, पाडळकर मार्केट, आदी बाजारपेठांत ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे.
यंदा पावसाने चांगला हात दिल्याने राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, आदी ठिकाणी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. तयार चटणीपूड घेण्याकडेही काहींचा कल असतो. तरीही पेठापेठांमध्ये मिरच्या विकत घेऊन, त्या वाळवून पारंपरिक डंगावर नेऊन त्यांची चटणीपूड केली जाते. त्यानंतर लागेल त्या प्रमाणात कांदा-लसूण चटणी तयार केली जाते.
यंदा पावसाने हात दिल्याने मिरचीचे दर ३० ते ४० टक्के दर खाली आले आहेत. आवकही दिवसाला तीन ट्रक अशी आंध्र, कर्नाटकातून कोल्हापूरच्या बाजारपेठेत होऊ लागली आहे. या मिरच्यांसह नव्याने हायब्रीड प्रकारची मिरचीही दाखल झाली आहे. तिचा प्रतिकिलो दर ९० रुपये दरम्यान इतका स्वस्त आहे. मात्र, चव, रंग आणि टिकाऊपणा यात दर्जाहीन आहे.
- पापाभाई बागवान, मिरची व्यापारी,
लक्ष्मीपुरी, कोल्हापूर
एक किलोसाठी एक तोळा मसाले
एक किलो चटणी बनविण्यासाठी सर्वसाधारणपणे धने, जिरे, तीळ, खोबरे, हळकुंड, लवंग, दालचिनी, मोहरी, हिंग, बदामफूल, मेथी, मसाला वेलदोडे, काळी मिरी, नाकेश्वर, रामपत्री, धोंडफूल, जायफळ, खसखस, बडीशेप, मीठ, शहाजिरे, हिरवे वेलदोडे, तमालपत्री या मसाल्यांचा वापर केला जातो. एक किलोसाठी प्रत्येकी एक तोळा मसाले वापरले जातात. यासाठी किमान आजच्या परिस्थितीत ३२० ते ३५० रुपये इतका खर्च येतो. याशिवाय प्रतिकिलो तिखटपूड बनविण्यासाठी ३० ते ४० रुपये इतका किलो दर आहे.