सहकाराची त्रिस्तरीय समिती करणार बाजार समितीच्या कारभाराची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 16:20 IST2020-07-17T16:17:43+5:302020-07-17T16:20:18+5:30
बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत.

सहकाराची त्रिस्तरीय समिती करणार बाजार समितीच्या कारभाराची चौकशी
कोल्हापूर : बाजार समितीच्या कारभारावरून झालेल्या तक्रारी आणि लेखापरीक्षणात आढळलेले दोष यांची गंभीरपणे दखल घेत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी त्रिस्तरीय समितीमार्फत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेशही दिले आहेत.
बेकायदेशीर नोकरभरती, प्लॉट हस्तांतरण, बोळ व खुल्या जागांमध्ये प्लॉट पाडून हस्तांतरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, आदी प्रकरणी विद्यमान सत्ताधाऱ्यांविरुद्ध सहकारचे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींना अनुसरून लेखापरीक्षण करण्यात आले, त्यातही गंभीर दोष आढळून आले.
तक्रार अर्जाद्वारे समोर आलेले मुद्दे, लेखापरीक्षणात आढळून आलेले गंभीर दोष व अनियमितता यांतून बाजार समितीचे आर्थिक नुकसान तसेच अपहार झाला आहे का, याची सखोल चौकशी करणे आवश्यक वाटत असल्याने जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
तक्रारदारांमध्ये नयन प्रसादे, भगवान काटे, ॲडव्होकेट किरण पाटील, नाथाजी पाटील, भीमराव पाटील, बी. बी. पाटील यांचा समावेश होता.
प्रदीप मालगावे समितीचे अध्यक्ष
कोल्हापूर शहरचे उपनिबंधक प्रदीप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत शिरोळचे साहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड व विशेष लेखापरीक्षक वर्ग दोनचे अनिल पैलवान हे दोन सदस्य आहेत.
सात दिवसांत अहवाल
ही समिती १३ मुद्द्यांची चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे.