Three others involved in Pansare murder, confession of suspects | पानसरे हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश, संशयितांची कबुली

पानसरे हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश, संशयितांची कबुली

ठळक मुद्देचार दिवसांची पोलीस कोठडीत वाढ : पानसरे हत्या प्रकरण वाढीव कोठडीची मागणी करणार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येपूर्वी सर्व संशयित आरोपींनी बेळगाव जवळील किणये येथे पाईप बॉम्ब प्रशिक्षण घेतले. त्यानंतर संशयित अमोल काळे, वासुदेव सूर्यंवशी यांचेसह आणखी तिघे कोल्हापूरातून एसटी बसने प्रवासात अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले. याठिकाणी घनदाट जंगलातील एका शेडमध्ये टारगेटवर एअरपिस्तुलवर सराव केल्याची माहिती एसआयटीच्या तपासात पुढे आली आहे.

या माहितीला संशयित सचिन अंदूरे याने दूजोरा दिला आहे. हत्येमध्ये आणखी तिघांचा समावेश असून त्यांचेसह कोणत्या जंगलात सराव केला त्याचा तपास एसआयटी करीत असल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.

संशयित सचिन प्रकाशराव अंदूरे (वय ३२, रा. राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, रा. हबीबी चाळ, हुबळी-धारवाड), गणेश दशरथ मिस्किन (३०, रा. गणेश देवस्थान समोर चैतन्यनगर, हुबळी) यांच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज, सोमवारी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपासात निष्पन्न झालेले पुरावे न्यायालयासमोर हजर केल्याने त्यांच्या आणखी चार दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

पानसरे हत्ये प्रकरणी सचिन अंदूरे याला विशेष न्यायालय पुणे आणि अमित बद्दी व गणेश मिस्किन यांना एन. आय. ए. न्यायालय मुंबई येथून ६ सप्टेंबरला ताबा घेवून कोल्हापूर एसआयटीने अटक केली होती. त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दूसऱ्यांदा त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायदंडाधिकारी राऊळ यांच्या समोर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी तपासाची माहिती दिली. त्यांनी सांगितले, पानसरे हत्येपूर्वी संशयितांनी विरेंद्र तावडे याच्या सांगण्यावरुन ‘पाईप बॉम्ब’ चे प्रशिक्षण बेळगाव जवळील किणये येथे घेतले. त्यानंतर सचिन अंदूरे हा कोल्हापूरात आला.

काहीकाळ त्याचे वास्तव कोल्हापूरात होते. तावडे याने दोन पुरोगामी विचारवंत व एक लेखक यांच्या रेकीसाठी बैठक घेतली होती. अंदूरे हा भौगलीक माहिती सांगतो परंतु ठिकाण सांगत नाही. अंदूरे याने अंबाबाई मंदिरापासून पानसरे यांचे कार्यालय तसेच मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत रेकी केली होती.

अमोल काळे आणि अंदूरे कोल्हापूरातून एसटी बसने अडीच तासाच्या अंतरावरील जंगलव्याप्त भागात गेले. या दोघांसह आणखी तिघांचा समावेश होता. जंगलातील एका शेडमध्ये टारगेटवर एअर पिस्तुलवर सर्वांनी सराव केल्याचे अंदूरे याने कबुली दिली आहे.

अंदूरे याने सात जिवंत काडतुसे तर गणेश मिस्किलने पिस्तुल आनली होती. वासुदेव सूर्यवंशी याने पिस्तुलातून फायरिंग केले होते, अशी माहिती पुढे आली आहे. अंदूरे हा महत्वाचा पुरावा आहे. तो अर्धवट माहिती देत आहे. तिघे अनोळखी व्यक्ती कोण? आहेत, त्यांनी कोणत्या जंगलात फायरिंगचा सराव केला याच्या तपासासाठी पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती अ‍ॅड. राणे यांनी केली.

या युक्तीवादाला आरोपीचे वकील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी आक्षेप घेत न्यायालयीन कोठडीची विनंती केली. दोन्ही वकीलांचे म्हणणे ऐकून न्यायाधिश राऊळ यांनी २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी देखील न्यायालयासमोर तपासाची बाजू मांडली.

अंदूरेने केली न्यायाधिशांकडे तक्रार

सुनावणी संपलेनंतर संशयित सचिन अंदूरे याने न्यायाधिशांसमोर तपास अधिकारी अमृत देशमुख हे माझेवर दबाव टाकत आहेत. त्यांनी तुला ५० लाख रुपये देतो, कबुली देवून हा विषय संपव, आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल. तुझ्या पत्नीच्या नावावर पैसे टाकतो. तसेच दोन दिवसापूर्वी भाऊ भेटायला आला असता त्याला आता सचिनचे संपलय सगळ, त्याच्या पत्नी, मुलांना सांभाळा अशी धमकी दिली. माझ्या सभोवती पोलीस उभे करतात.

बंदूक घेवून उभे असलेले पोलीस देखील माझेवर प्रश्नांचा भडीमार करतात. मला धक्काबुक्की केली आहे. देवीच्या मंदिरात मी गेलो होतो असे पोलीसांचे मत आहे. कधी गेलो होतो हे सांगत नाहीत. विनाकारण मला अडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार केली. त्यावर न्यायाधिश राऊळ यांनी तुला मारहाण झाली का? असे विचारताच नाही म्हणून सांगितले. तुझी वैद्यकीय तपासणी करुया का? असे विचारताच त्याने नको म्हणून सांगितले.
 

 

Web Title: Three others involved in Pansare murder, confession of suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.