कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावात एका पोल्ट्रीधारकांने काल, मंगळवारी तीन अल्पवयीन मुलांना बांधून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नेसरी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावरील हडलगे गावातील हा प्रकार बुधवारी समजला. संबधित पोल्ट्री धारकाने या मुलांना जबरदस्तीने पकडले. या पोल्ट्रीमधील काहीं कोंबड्यांना या मुलांनी पाणी पाजल्यामुळे या कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असा या पोल्ट्री धारकांचा संशय आहे. त्यामुळे त्याने या मुलांना मारहाण केली. दरम्यान यासंदर्भात मुलांच्या पालकांनी त्याला जाब विचारला परंतु त्याने दाद दिली नाही, त्यामुळे त्यांनी नेसरी पोलीस ठाणे गाठले. पालक आणि पोल्ट्री धारक यांच्यात तडजोड झाल्याने पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापुरातील आभास फाउंडेशनचे प्रमुख आणि बालहक्क बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी बालहक्क आयोगाकडे आज, बुधवारी तक्रार केली. आयोगाने याची तत्काळ दखल घेतली असून जिल्हा प्रशासनाकडून सविस्तर माहिती मागवली आहे.
धक्कादायक! तीन अल्पवयीन मुलांना बांधून मारहाण, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना
By संदीप आडनाईक | Updated: June 12, 2024 17:32 IST