कोल्हापूर : येथील न्यू शाहूपुरीतील पाटणकर पार्क येथे राहणाऱ्या सीपीआरमधील विभागप्रमुख डॉ. अनिता अरुण परितेकर यांच्या घरफोडीप्रकरणी कर्नाटकातील तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या या घरफोडीमुळे माेठी खळबळ उडाली होती. पावसामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासणीमध्ये अनेक अडचणी आल्या. परंतु, त्यावर मात करत पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ३६ लाख ७० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.वेंकटेश रमेश ( वय २३, मूळ रा. सरकारी शाळेसमोर, वेंकटेशनगर, चलकेरे, ता. चलकेरे, जि. चित्रदुर्ग), गिरीश वेंकटेश (वय २१, मूळ रा. बोंमवारा, ता. देवनहळ्ळी, जि. बंगळुरू,), रणजित रमेश ( वय २१, मूळ रा. वेंकटेशनगर, चलकेरे, ता. चलकेरे, जि. चित्रदुर्ग, तिघेही सध्या रा. वाल्मिकीनगर, बंगळुरू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या संशयितांकडून चोरीतील २५०.७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे दागिने, दागिने विक्री करून घेतलेली वाहने असा एकूण ३६ लाख ७० हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या सुमारास डॉ. परितेकर यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, डायमंडचे दागिने, मोबाइल फोन व रोख रक्कम असा एकूण ४२ लाख ३४ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस करीत होते. घटनास्थळी भेट देऊन वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले.परंतु, पावसामुळे फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करताना अनेक अडचणी आल्या. तरीही पोलिसांनी त्यावर मात करीत चोरट्यांचा माग काढत बंगळुरू गाठले. तेथील रेकॉर्डवरील गुन्हेगार वेंकटेश रमेश याने साथीदारासह घरफोडी केल्याचे समोर आले. आठ दिवस सापळा रचून या तिघांना अटक केली. वेंकटेश रमेश याच्या घरझडतीमध्ये ९०.७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि डायमंडचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे तसेच एक चारचाकी, एक दुचाकी वाहन मिळून आले. यातील चारचाकी, दुचाकी वाहने चोरीतील दागिने विक्री करून घेतल्याचे समोर आल्याने त्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
घरफोडीसाठी चोरीची दुचाकीघरफोडीसाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी पुणे जिल्ह्यातील सांगवी येथून चोरी केल्याचे तपासातून समोर आले. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिस करणार आहेत.