पाचगाव : पाचगाव (ता. करवीर) येथे गणेश आगमन मिरवणुकीत गाणी लावण्याच्या वादातून व वर्चस्ववादातून रणजीत गवळी, अरुण मोरे आणि चेतन गवळी यांनी बंदुकीचा धाक दाखवत महिलांना तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हृषीकेश भोसले यांनी करवीर पोलिस ठाण्यात या तिघांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विनापरवाना सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, वॅगन आर कार असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचगाव येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सगळीकडे खळबळ उडाली.घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (दि.२५) रात्री बळवंतनगर मित्र मंडळ, पाचगाव यांची आर. के. नगर ते पाचगाव जाणाऱ्या रोडवरून गणपतीची आगमन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक सहजीवन सोसायटी परिसरात आली असताना मिरवणुकीमध्ये हृषीकेश भोसले (रा. पाचगाव) हा नाचत होता. त्यावेळी रणजीत गवळी, चेतन गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांच्यासोबत किरकोळ वाद झाला. त्यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू झाली. हृषीकेश भोसले हा रात्री दीडच्या सुमारास घरी जात असताना रणजीत गवळी व त्याचा मित्र अरुण मोरे यांनी त्यांच्याकडील वॅगन आर कारमधून आले. रणजीत मोरे याने त्याच्याकडील बंदूक हृषीकेश भोसले याच्या डोक्याला लावली आणि ‘तुला आता जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात हृषीकेश भोसले याने करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, करवीर पोलिसांनी घडल्या प्रकाराबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कळवले. त्यानुसार पोलिस सत्यजीत तानुगडे यांना माहिती मिळाली की, हृषीकेश भोसले यास धमकावणारे आरोपी हे बंदूक घेऊन वॅगन आरमधून पाण्याचा खजिना येथे येणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने मंगळवारी त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना बंदुकीसह ताब्यात घेतले व त्यांना करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले.राग मनात धरून कृत्यवर्चस्ववादातूनच मे २०१८ मध्ये प्रतीक सरनाईक याने प्रतीक पवार याचा खून केला होता. कालच्या मिरवणुकीत फिर्यादी हृषीकेश भोसले हा प्रतीक सरनाईक याचे गाणे लावून नाचत होता. तो राग मनात धरून रणजीत गवळी, चेतन गवळी आणि अरुण मोरे यांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात होते.
Kolhapur: मिरवणुकीत बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या तिघांना अटक, पाचगावात पूर्ववैमनस्यातून प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 19:04 IST