मे मधील चाचणीसाठी जुलैमध्ये अधिसूचना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वरातीमागून घोडे
By संदीप आडनाईक | Updated: July 21, 2023 16:36 IST2023-07-21T16:36:05+5:302023-07-21T16:36:18+5:30
मॅटची सुनावणी पुन्हा लांबली

मे मधील चाचणीसाठी जुलैमध्ये अधिसूचना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वरातीमागून घोडे
संदीप आडनाईक
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपिक टंकलेखक आणि कर सहायक परीक्षा देऊनही चुकीच्या निकषामुळे हजारो विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबत आयोगाला चूक लक्षात आल्यामुळे ३१ मे रोजी झालेल्या चाचणीसाठी नवीन अधिसूचना गुरुवारी जारी केली. यामुळे आयोगाचे हे ‘वरातीमागून घोडे’ पळवण्यामागे काहीतरी गौडबंगाल आहे, हे निश्चित. ‘लोकमत’मधून या प्रकरणावर ‘एमपीएससीचा तिढा, विद्यार्थ्यांना पीडा’ या शीर्षकाखाली तीन भागांत प्रकाश टाकला होता. आयोगाच्या निकषाच्या संभ्रमावस्थेचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
आयोगाने या परीक्षेसंदर्भात तीन अधिसूचना प्रकाशित केल्या. नव्या अधिसूचनेनुसार प्रत्यक्ष चाचणीतील की डिप्रेशन विचारात न घेता, चाचणीची पात्रता ठरविताना पहिल्या १५०० की डिप्रेशननुसार जेवढे शब्द तयार होता, त्या शब्दांच्या ९३ टक्के बरोबर शब्द अराखीव उमेदवारांसाठी आणि त्या शब्दांच्या ९० टक्के बरोबर शब्द राखीव उमेदवारांसाठी असे नवे निकष जारी केले आहेत. उदाहरणार्थ १९०० की डिप्रेशनच्या उताऱ्यात प्रत्यक्ष पात्रता ठरविताना त्यातील पहिल्या १५०० की डिप्रेशननुसार जर २३६ शब्द तयार होत असतील अराखीव उमेदवारांचे २१९ अचूक शब्द आणि राखीव उमेदवारांसाठी २१२ शब्द मान्य होणार आहेत. यापुढील सर्व टंकलेखन कौशल्य चाचणीतील उमेदवारांची पात्रता ही याच निकषावर ठरविणार असल्याचे आयोगाने गुरुवारी जाहीर केले.
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालयीन लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गासाठी १४६४ जागांसाठी ३००३ उमेदवार पात्र ठरवले. नेहमीप्रमाणे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा हे दोन टप्पे उत्तीर्ण झाल्यानंतरही आयोगाने प्रथमच कौशल्य चाचणीचा तिसरा टप्पा घेतला. ७ एप्रिलला चाचणी घेऊनही पुन्हा त्यांची ३१ मे या दिवशी चाचणी घेतली. याचा निकाल १२ जुलैला लावत हजर २३३० उमेदवारांमधील २५० जणांना अपात्र ठरवत तितक्या जागा रिक्त ठेवल्या. या प्रकरणी ‘लोकमत’ने प्रकाश टाकला.
मॅटची सुनावणी पुन्हा लांबली
दरम्यान, मॅटमधील सुनावणी दोनवेळा तहकूब झाली आहे. ७ एप्रिल रोजीच्या चाचणीतील त्रुटीसंदर्भात मॅटमध्ये आयोगाची बाजू मांडण्यासाठी वकील उपस्थित न राहिल्याने पुढे गेलेली सुनावणी आज, गुरुवारी होती. मात्र, मुंबईतील पावसामुळे पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीच्या पात्रतेच्या निकषाच्या विरोधात १२० उमेदवार पुन्हा मॅटमध्ये जात आहेत.