हजार कोटींत रंकाळ्याच्या नशिबी शेवटी दमडीच!
By Admin | Updated: March 12, 2015 23:52 IST2015-03-12T23:45:46+5:302015-03-12T23:52:37+5:30
अर्थसंकल्पात अनास्था : एक कोटीची तरतूद; दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींकडे लक्ष

हजार कोटींत रंकाळ्याच्या नशिबी शेवटी दमडीच!
संतोष पाटील - कोल्हापूर -राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली तरी रंकाळ्यात मिसळणाऱ्या दूषित पाण्याचे मूळ दुखणे कायम आहे. यातच संरक्षक भिंती कोसळू लागल्याने रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. असे असताना नव्या अर्थसंकल्पात रंकाळ्यासाठी फक्त एक कोटी निधीची तरतूद महापालिका प्रशासनाने केली आहे. प्राथमिक अवस्थेत असलेल्या तीन ते चार अकरा मजली इमारतींसाठी जर्मनीहून साडेआठ कोटींची टर्न टेबल लॅडर (फिरती शिडी) खरेदी करण्याचा मानस प्रशासनासह बड्या नगरसेवकांचा आहे. मात्र, रंकाळा संवर्धनासाठी तोकडी तरतूद केली आहे. रंकाळा संवर्धनातील पहिल्या टप्प्याचा हिशेब शासनाला सादर न करताच दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवर पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या चार वर्षांनंतर पूर्ण झाले. तरीही शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळतच आहे. निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहे. गाळ काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. केंदाळ काढणे, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हरफ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झाले नाही. साडेआठ कोटी खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात तसूभरही फरक पडलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीतून गाळाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून रंकाळ्याचे नैसर्गिकरीत्या पुनर्भरण करणे, ड्रेनेज लाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, अत्याधुनिक लेसर शोसह अॅम्पी थिएटर, आदी कामे करण्याचे स्वप्न प्रशासन पाहत आहे. हा सर्व कागदोपत्री असलेला कारभार प्रत्यक्षात उतरण्यास मोठा अवधी लागणार आहे. दरम्यान, रंकाळ्याचे दुखणे कायमपणे सोडविण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे होेते. रंकाळ्याकडे दुर्लक्ष करीत निव्वळ मलईसाठी साडेआठ कोटींच्या शिडी खरेदीचा डाव आखल्याची चर्चा आहे.
पहिल्या टप्प्याचा पत्ता नाही; दुसऱ्याची घाई
प्रदूषण थांबविण्यासाठी मोठी तरतूद अपेक्षित होती
अखेरची घटका मोजणाऱ्या रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे.
दर तीन महिन्यांनी रंकाळ्याला जलपर्णी, जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात.
मूळ दुखणे सोडून डागडुजी करण्याकडेच प्रशासनाचा कल आहे. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून पाहिजे तितका निधी रंकाळ्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
रंकाळ्यास पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी राजकीय व प्रशासकीय मुत्सद्दीपणा दाखविण्याची गरज आहे.
तत्पूर्वी, स्वनिधीतून महापालिका प्रशासनाने किमान प्रामाणिक सुरुवात करावी, अशी अपेक्षा रंकाळाप्रेमींतून व्यक्त होत आहे.
शिक्षण मंडळाचे बजेट संपले वेतन, पेन्शनमध्येच
कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने सन २०१४-१५चे सुधारित व सन २०१५-१६चे नवीन ३० कोटी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सभापती संजय मोहिते व उपसभापती महेश जाधव यांनी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांना गुरुवारी सादर केले. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
३० कोटींच्या बजेटमधून २२ कोटी वेतन, तर ६ कोटी पेन्शनवर खर्च होणार आहेत. शिक्षण ही भविष्यकाळातील गुंतवणूक असून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पायाभरणीचा काळ आहे. ही बाब ध्यानात घेत मंडळाने सादर केलेल्या कामांसाठी भरघोस विशेष अनुदान मिळावे, अशी मागणी सभापती मोहिते यांनी केली. प्रत्येकी दोन गणवेश, ई-लर्निंग सॉफ्टवेअर, एलसीडी प्रोजेक्टर, शाळांना अद्ययावत फर्निचर, सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे, क्रीडा व प्रयोगशाळा साहित्य, झोपडपट्टी भागात बालवाडी सुरू करणे, आदींसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी सदस्यांनी केली.
यावेळी उपायुक्त विजय खोराटे, उपायुक्त अश्विनी वाघमळे, प्रशासन अधिकारी बी. एम. किल्लेदार, सदस्य अशोक पोवार, जयश्री साबळे, भरत रसाळे, समीर घोरपडे, रशीद बारगीर, जहॉँगीर पंडत, लेखापाल मोहन सरवळे उपस्थित होते.