Thousands of devotees bow down to Mauli Chari for a show | माऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक, दर्शनासाठी गर्दी
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली.

ठळक मुद्देमाऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक, दर्शनासाठी गर्दी रात्री लोटांगणांनी नवस फेडणार, चोख नियोजनामुळे जत्रोत्सव उत्साहात

तळवडे : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली. माऊलीच्या जयघोषात भक्तगणांनी सकाळपासून गर्दी करून श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले.

जत्रोत्सवानिमित्त सकाळी रूढीप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री देवी माऊलीच्या दर्शनास सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री देवी माऊलीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य, एसटी वाहतूक, वीज वितरण प्रशासन, पोलीस प्रशासन, राखीव पोलीस दल, होमगार्ड आदींकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी माऊलीची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक माऊलीच्या दर्शनासाठी बुधवारी आले होते. माऊली देवीचे भव्यदिव्य मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. पूर्ण परिसर दुकाने व वाहने यांनी गजबजून गेला होता.

यावेळी सोनुर्ली माऊली देवस्थान समिती, देवस्थानचे मानकरी, माऊली भक्तगण मंडळ, सोनुर्ली, मळगाव गावातील ग्रामस्थ, भक्तमंडळ, पोलीस प्रशासन यांच्या अतिशय नियोजनबद्धरित्या सहकार्याने सुलभरित्या भक्तगणांना दर्शन घेता येत होते. भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या माऊली देवीचा महिमा देश-विदेशात पोहोचला आहे.
सायंकाळी मळगाव गावाकडून देव वाजत-गाजत माऊली देवस्थानकडे आले. सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे हे दैवत आहे. अशा या उत्सवाकडे सर्व भक्तगण आवर्जून पाहत असतात.

श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविली होती. जत्रोत्सवानिमित्त सोन्याचांदीच्या दागिन्यांनी तिला सजविले होते. देवीचे हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
 

Web Title: Thousands of devotees bow down to Mauli Chari for a show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.