corona virus-अफवा पसरविणाऱ्यांना खावी लागणार तुरुंगाची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:46 IST2020-03-17T16:44:43+5:302020-03-17T16:46:11+5:30
कोल्हापूर : ‘पेट्रोल पंप बंद होणार......एस.टी. बंद राहणार... कोरोना प्रतिबंध करणारी लसची निर्मिती झाली...’अशा विविध अफवा फोनवरून व सोशल ...

corona virus-अफवा पसरविणाऱ्यांना खावी लागणार तुरुंगाची हवा
कोल्हापूर : ‘पेट्रोल पंप बंद होणार......एस.टी. बंद राहणार...कोरोना प्रतिबंध करणारी लसची निर्मिती झाली...’अशा विविध अफवा फोनवरून व सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत. यामुळे जनसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून, अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. अशा अफवा पसरविणाºयांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अफवांचे पेव फुटले आहे. याची प्रचिती सोमवारी सायंकाळी आली. रात्रीपासून पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे फोन व सोशल मिडीयावरुन पसरल्याने सर्व पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या.
अतिउत्साही लोकांनी या अफवांना हवा देण्याचे काम केले. लोक अस्वस्थ झाले. जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल पंप सुरू राहणार असल्याचे जाहीर करावे लागले. काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांचे सिम्बॉल वापरून कोरोना संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आला.
वृत्तवाहिन्यांचा सिम्बॉल म्हटल्यावर लोकांचा चटकन विश्वास बसतो; हा यामागील हेतू असतो. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी अशा पोस्टवर सायबर सेलचे लक्ष असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीर केले होते. मंगळवारी तर एस. टी. बंद राहणार असल्याची अफवा पसरली.
याबाबत जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, अशा अफवांबाबत कारवाई करण्याबाबात पोलीस प्रशासनाला कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करून त्यांना पोलिसी खाक्या दाखविला जाणार आहे.
यासाठी नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्यांची सोशल मीडियावरील पोस्ट तसेच अफवा पसरविण्यासाठी आलेला फोन याची माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.