इच्छुकांना लागली आरक्षणाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:57 IST2020-12-05T04:57:53+5:302020-12-05T04:57:53+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांना केवळ ...

इच्छुकांना लागली आरक्षणाची धास्ती
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आता पाच महिन्यांवर येऊन ठेपली असताना ही निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांना केवळ आरक्षणाची धास्ती लागून राहिली आहे. प्रभागावरील आरक्षण सोडत केव्हा निघणार आणि आरक्षण कोणते पडणार याकडेच सर्व इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील अनेक तरुणांना तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणे अपेक्षित होते; परंतु कोविड १९ ची साथ तसेच दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या मुदतीसाठी महापालिकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे; त्यामुळे सहा महिन्यांच्या आत ही निवडणूक होणारच, असा इच्छुकांचा दावा आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात साधारण आठ ते दहाजण इच्छुक उमेदवार आहेत. आपापल्या प्रभागात त्यांचा संपर्क वाढलेला आहे; परंतु उघडपणे त्यांनी आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नाहीत. त्याला आरक्षणाचे कारण आहे. प्रभागावर कोणते आरक्षण पडणार आहे याचा नेमका अंदाज लागत नसल्याने उच्छुकांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. आपल्याला हवे तसे आरक्षण प्रभागावर राहावे, यासाठी अनेकजण देव पाण्यात घालून बसले आहेत.
काही इच्छुक आपल्या आपल्या पद्धतीने आरक्षणाची सोडत काय होईल याचे आडाखे बांधत आहेत. मागच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रभाग असलेले नऊ प्रभाग आता पूर्वीसारखे राहणार नाहीत. त्यामुळे तेथे सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.आरक्षणाची सोडत ड्रॉ पद्धतीने काढण्यात येणार आहे; परंतु अनुसूचित जाती-जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण कोणत्या प्रभागावर राहणार याचा नेमका अंदाज येत नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू असून त्यांच्या नजरा सोडतीकडे लागल्या आहेत.
शेजारच्या प्रभागावर चाचपणी
अनेक माजी नगरसेवकही आरक्षणाच्या सोडतीमुळे त्रस्त आहेत. आपल्याला सोयीचे आरक्षण प्रभागावर पडले नाही तर काय करायचे याचे पर्याय शोधले जात आहेत. पती किंवा पत्नी हा पर्याय तर आहेच, शिवाय शेजारच्या प्रभागातही उभे राहता येईल का, याची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक माजी नगरसेवकांच्या नजरा या शेजारच्या प्रभागाकडे वळल्या आहेत. शेजारच्या प्रभागात आपल्याला किती मते मिळतील, कोणत्या मंडळांना, कार्यकर्त्यांना हाताला धरता येईल, याचे अंदाज घेतले जात आहेत.
उर्वरित कामांसाठी आग्रह
गेल्या सभागृहातील नगरसेवकांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आपापल्या प्रभागात २० ते २५ लाखांची कामे धरली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. निवडणुकीत हीच कामे तारणार असल्याने ती पूर्ण करावीत, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे तगादा लावला आहे.