कोल्हापूर गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी दिवसभर कसून चौकशी
By Admin | Updated: August 25, 2014 00:02 IST2014-08-24T23:41:05+5:302014-08-25T00:02:15+5:30
एटीएस’चे पथक कोल्हापुरात : धागेदोरे अद्याप हाती नाहीत

कोल्हापूर गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी दिवसभर कसून चौकशी
कोल्हापूर : शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे येथील दहशतवादी विरोधी पथक आज, रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाबरोबरच आजू-बाजूच्या परिसराची कसून तपासणी केली. चिकनच्या गाडीचा चालक श्रीधर कोठावळे व मनोज परब या दोघा तरुणांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. नेमका बॉम्ब कोणी ठेवला, कोणत्या कारणासाठी ठेवला याचे गूढ मात्र, अद्याप एटीएस पथकासह कोल्हापूर पोलिसांना उलगडता आलेले नाही.
शाहू जकात नाक्याजवळ शनिवारी चिकनचे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात गाडीचालक श्रीधर कोठावळे व मनोज परब हे दोघे जखमी झाले. या स्फोटाची माहिती गोकुळ शिरगाव व राजारामपुरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी तरुणांकडे कसून चौकशी केली. परंतु त्यांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. कोल्हापुरातील बॉम्बशोध पथकाने घटनास्थळी येऊन परिसराची चाचपणी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दल दक्ष असताना शाहू जकात नाक्याजवळ बॉम्बस्फोट झाल्याने पोलीस प्रशासनाची झोपच उडाली. गृहखात्यानेही या प्रकरणाची माहिती मागविल्याने पोलीस आज दिवसभर परिसरात तळ ठोकून होते.
दरम्यान, आज पहाटे दहशतवादी विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक हे टीमसह घटनास्थळी आले. त्यांनी हातगाडीच्या सभोवती सुमारे चार तास तपास केला. त्यानंतर जखमी तरुणांकडे बंद खोलीत चर्चा केली. बॉम्बचा स्फोट कसा झाला, व्यावसायिक पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला आहे का? याची माहिती घेण्यात आली. (प्रतिनिधी)