असिफ कुरणे कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत दुसऱ्यांदा सत्ता मिळविली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता प्रभाव व राज्यात पुन्हा युतीचे सरकार येण्याचे मिळणारे संकेत यामुळे ३० पेक्षा जास्त आजी-माजी आमदारांनी आतापर्यंत पक्षांतर केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांनी केलेले हे पक्षांतर सत्ताधाऱ्यांना बळ देणारे ठरत आहे. या पक्ष बदलात सर्वांत मोठा वाटा पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्ट्याचा आहे.राज्यात युती सरकारच्या बाजूने तयार झालेले वातावरण पाहता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांतील आजी-माजी आमदारांमध्ये आपापल्या पक्षांना रामराम करून भाजप, शिवसेनेमध्ये सामील होण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आतापर्यंत १३ विद्यमान आमदार, तर १७ माजी आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर आणखी डझनभर आजी-माजी आमदार युतीत सामील होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. सध्या त्याला ब्रेक लागला आहे. मात्र भाजप-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब व जागा वाटप झाल्यानंतर विधानसभेच्या जागांमधील स्थितीनुसार ही पक्ष बदलाची लाट कमी जास्त होण्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.लोकसभेनंतर आतापर्यंत १५ विद्यमान आमदारांनी पक्षांतर केले असून, त्यातील सात आमदारांनी भाजप, तर आठ आमदारांनी सेनेत प्रवेश केला आहे. तर १६ माजी आमदारांपैकी नऊ जणांनी भाजप, सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. एमआयएममध्ये मालेगावच्या मौलाना मुफ्ती मोहम्मद सईद यांनी प्रवेश केला असून माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसपासून फारकत घेत सवतासुभा मांडला आहे.>संस्था टिकविणे, कारवाईची धास्तीपश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने, सहकारी संस्थांभोवती राजकीय गणिते गुंतलेली असतात. सत्तेच्या विरोधात राहून या संस्था, तसेच राजकारण टिकविणे अवघड असते. पाच वर्षे विरोधात राहिलेल्या आजी-माजी आमदारांना आणखी पाच वर्षे विरोधात बसणे अशक्य झाल्याने सत्तेसोबत जाण्याचे धोरण त्यांनी स्वीकारल्याचे दिसत आहे. भ्रष्टाचाराविषयीची कारवाई टाळणे व आपापल्या संस्था टिकविणे यालाच सध्या बहुतांश काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते.>पश्चिम महाराष्ट्रावर भर२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपने १९, शिवसेनेने १३ अशा ३२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला अवघ्या ७जागांवर समाधान मानावे लागले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण जागांपैकी जवळपास अर्ध्याजागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. मोदी लाटेतदेखील कायमराहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचे धोरण भाजप श्रेष्ठींनी आखल्याचे पक्षांतर करणारे नेते पाहिल्यानंतर दिसून येते.>विदर्भात कमी पक्षांतरभाजप, सेनेमध्ये सामील होणारे बहुतांश आमदार हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्ट्यातील आहेत. ज्या ठिकाणी पक्षाची ताकद कमी आहे, तेथे इतर पक्षांतील नेत्यांना आपल्यात सामावून घेण्याचे धोरण भाजपच्या नेत्यांनी अवलंबिले आहे. भाजपचा प्रभाव असलेल्या विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामधून फारसे कोणी नव्याने सहभागी झालेले नाही.
#VidhanSabha2019 : तीस आजी-माजी आमदारांनी बदलला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:34 IST