रस्ते मूल्यांकनासाठी त्रयस्थ समिती
By Admin | Updated: January 29, 2015 00:52 IST2015-01-29T00:44:50+5:302015-01-29T00:52:56+5:30
मुंबईतील बैठकीत निर्णय : प्रकल्पाचा खर्च महिन्यात ठरणार; पुढील आठवड्यात समितीचा कोल्हापूर दौरा

रस्ते मूल्यांकनासाठी त्रयस्थ समिती
कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यासाठी संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली त्रयस्थ समिती नेमण्याचा निर्णय आज, बुधवारी मुंबईत टोलप्रश्नी पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात दुपारी दोन वाजता ही बैठक झाली. संतोषकुमार समिती चार दिवसांत कोल्हापूरला भेट देणार असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहे. यानंतर एका महिन्यात प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यात येईल, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील बैठकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, महापौर तृप्ती माळवी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपसंचालक (नगररचना) डी. एस. खोत, आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यासाठी तज्ज्ञांची त्रयस्थ उपसमिती नेमण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सर्वसमावेशक अशी ही समिती असावी, असा आग्रह सर्वांनीच धरला. समितीने ठरविलेल्या किमतीबाबत शंका राहू नये, यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग अॅँड आर्किटेक्ट असोसिएशनचा एक सदस्य, तसेच कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना या समितीमध्ये घेण्यात आले. टोल रद्द करण्यासाठीचा हा पहिला टप्पा आहे. यापूर्वी नेमलेल्या समित्यांनी फक्त दर्जा तपासला. प्रकल्पाचा नेमका खर्च पुढे आलाच नाही. प्रकल्पाचे पैसे भागविण्याचे अनेक पर्याय पुढे आहेत. ही समिती महिन्याभरात अहवाल देणार असून, यानंतर टोलचे पैसे भागविण्याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)